दसरा मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जय्यत तयारी; शिंदे गटातील अडीच लाख शिवसैनिकांना जेवणाची सुविधा
By अजित मांडके | Published: October 4, 2022 04:07 PM2022-10-04T16:07:37+5:302022-10-04T16:08:11+5:30
शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या १८५ बस बुक करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय अडीच लाख शिवसैनिकांसाठी ठाण्यातील नावाजलेल्या मिठाईवाल्याकडून जेवणाचे डबे देखील रवाना होणार आहेत.
ठाणे : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून ३५० बसेस रवाना होणार असून, ५० हजार शिवसैनिक या दसरा मेळाव्याला हजेरी लावतील, असा दावा करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने मात्र लोकल व पायी प्रवासाला महत्व देत शिवतीर्थावरील दसरा मेळावा हाच खरा मेळावा असल्याचे सांगितले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी ठाण्यात शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे बॅनर लावण्यात आले होते. आता ठाकरे गटाकडूनही दसरा मेळाव्याचे बॅनर समोरा-समोर झळकल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे.
शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या १८५ बस बुक करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय अडीच लाख शिवसैनिकांसाठी ठाण्यातील नावाजलेल्या मिठाईवाल्याकडून जेवणाचे डबे देखील रवाना होणार आहेत.
ठाकरे आणि शिंदे गट वेगळा झाल्याने यंदा दसरा मेळाव्याला देखील अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. दसरा मेळावा हीट करण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसैनिकांना विविध स्वरुपाची प्रलोभने दिली जात आहेत. त्यात प्रत्येक माजी नगरसेवकाला ५ ते १० बसची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार ३५० बस ठाण्यातून रवाना होणार असून ५० हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय छोट्या वाहनांची सोयदेखील करण्यात आली आहे. तर ठाण्याच्या विविध भागांत दसरा मेळाव्याचे बॅनरही झळकले आहेत.
तिकडे ठाकरे गटाने मात्र, लोकल प्रवासाला पसंती दिल्याचे दिसत आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी ठाण्यात जांभळीनाका येथे शिवसैनिक जमणार असून त्याठिकाणी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर लोकलने खासदार राजन विचारे यांच्यासह हजारो शिवसैनिक शीवतिर्थावर रवाना होणार आहेत. ठाकरे गटाकडून बसची व्यवस्था मात्र करण्यात आल्याचे दिसत नाही. तर, ठाकरे गटाकडूनही ठाण्याच्या विविध भागात बॅनर लावण्यात आल्याचे दिसत आहे. बॅनरबाजीतून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याचे दिसत आहे.
एसटीच्या १८५ बस जाणार दसरा मेळाव्याला -
शिवसेनेच्या बालेकिल्यातून अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यातून बीकेसीला दसरा मेळाव्यासाठी १८५ बस जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील १६० बस भिवंडी तर २५ बस वाडा डेपोतून जाणार असल्याची माहिती एसटीच्या सुत्रंनी दिली. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या बस बुक केल्याचे बोलले जात आहे.
अडीच लाख शिवसैनिकांना जेवण
ठाण्यातून शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांची जेवणाची सोय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ठाण्यातील नामांकीत मिठावाल्यालाकडून तशा प्रकारचे जेवण तयार करण्याचे काम करण्यात आले आहे. या फुड पैकेट मध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे पदार्थ देण्यात आले आहेत. खिचडी, वडापाव, समोसा असे पदार्थ देता जे चांगले राहतील असे पदार्थ ठेवण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.