सूर्याच्या पाण्यासाठी लढा उभारण्याची सज्जता
By admin | Published: March 17, 2017 05:49 AM2017-03-17T05:49:05+5:302017-03-17T05:49:05+5:30
सूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे
हितेन नाईक , पालघर
सूर्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पायदळी तुडविला जात असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे मोठे क्षेत्र नापीक ठरण्याची व भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागण्याची आपत्ती ओढवू शकते. हे लक्षात घेऊन सूर्याचे पाणी जिल्ह्यातच राखण्यासाठी आरपारचा लढा उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.
सूर्या प्रकल्प हा जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रकल्प असून पालघर, विक्रमगड, डहाणू या तीन आदिवासी तालुक्यातील सुमारे १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे व ६.७५ मेगा वॅट वीजनिर्मिती करणे हा मूळ उद्देश बाजूला सारून मतांच्या वजनाचा सोईस्कररित्या वापर करून इथले पाणी वसई-विरारला नेले. राजकीय दबावातून सरकारने मीरा-भार्इंदरला दिले. त्यानंतर उरलेले पाणी मुंबई उपप्रदेशासाठी वळविण्यात आले आहे. हे रोखण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीला सूर्याच्या पाण्यासाठी प्रारंभा पासून लढा देणारे माजी आमदार नवनीत भाई शहा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, कुणबी सेनेचे जितू राऊळ, काँग्रेसचे केदार काळे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माकपचे एडवर्ड वरठा, कष्टकरीचे ब्रायन लोबो, आदिवासी एकताचे दत्ता करबट, श्रमजीवीचे राजेश राऊत, शेतकरी संघर्षचे संतोष पावडे, राजेश अधिकारी होते. रिपाई, मनसे, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.
डहाणू : सूर्या पाटबंधारे विभागांतर्गत आगवण ग्रामपंचायत हद्दीत चरी कोटबी येथे मागील काही महिन्यांपासून कालव्याला मोठे भगदाड पडून पाण्याचा अपव्यय होऊन शेतीला पाणी मिळत नव्हते. परिणामी आगवण परिसरात पाणीटंचाई भेडसावू लागली होती. त्याबाबत ग्रामपंचायतीने कालव्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस सरपंच दमयंती भुयाळ, उपसरपंच रूपजी कोम, ग्रामसेवक अरविंद संखे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने हा कालवा दुरुस्त केला.
त्यामुळे आगवण गावातील आजूबाजूच्या पाड्यांची पिण्याच्या पाण्याची, तसेच सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. सूर्या पाटबंधारे विभागाचा कालवा दाभले, वरून चरी कोटबी आगवणकडे जातो. भगदाड पडून पाणी वाहून जात होते. त्यामुळे चरी कोटबी, आगवण , दाबले, चिंचले या पाड्यांना शेतीला पाणी मिळत नव्हते. त्याबाबत ग्रामपंचायतीने सतत सूर्या पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करु न दुरूस्ती करण्याची मागणी केली होती पण ती व्यर्थ ठरली.
जवळजवळ १ लाख खर्च केले, जलवाहिनी दुरुस्त केली. आगवण ग्रामपंचायतीच्या मानपाडा, वाघाडी, शिशुपाडा, नवासाखरा, आगचण, चरी कोटबी या पाड्यांची पाण्याची समस्येवर त्यामुळे काही अंशी मात झाल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण पसरले आहे.