मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजकांकडून नियम धाब्यावर; ध्वनिप्रदूषण, दोन शस्त्रक्रिया केल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:13 AM2018-09-04T00:13:44+5:302018-09-04T00:13:56+5:30
ठाण्यातील दहीहंडीवरील शिवसेनेचा वरचष्मा पुसून टाकण्याकरिता भाजपाने प्रथमच आयोजित केलेल्या दहीहंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नियमांना आयोजकांनी हरताळ फासला.
ठाणे : ठाण्यातील दहीहंडीवरील शिवसेनेचा वरचष्मा पुसून टाकण्याकरिता भाजपाने प्रथमच आयोजित केलेल्या दहीहंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक नियमांना आयोजकांनी हरताळ फासला. या बेकायदा कृत्याकरिता ज्या पोलीस, पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा आसूड उगारायचा, तेही मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर हारतुरे स्वीकारत असल्याचे पाहायला मिळाले.
स्वामी प्रतिष्ठानने ज्या ठिकाणी ही हंडी बांधली होती, त्याच्या मागील बाजूस लहान मुलांचे खासगी इस्पितळ आहे. सोमवारी शाळेला सुटी असली, तरी हाकेच्या अंतरावर शाळा आहे. परंतु, या सर्व बाबी दुर्लक्षित करून आयोजकांना अनुमती कशी दिली गेली, असा सवाल केला जात आहे.
मोठा गाजावाजा करून यंदा ठाण्यात प्रथमच भाजपाच्या वतीने सर्वात मोठी हंडी उभारण्यात आल्याने समस्त ठाणेकरांच्या नजरा तिकडे लागल्या होत्या. बड्या रकमेच्या बक्षिसांमुळे गोविंदा पथकांची धमाल झाली असली आणि आयोजकांचे हित साधले गेले असले, तरी या परिसरातील हिरानंदानी मेडोज, म्हाडाच्या इमारतीत राहणाऱ्या सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले. दहीहंडी असल्याने काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चक्क बंद ठेवले होते. ध्वनिप्रदूषणाने सर्व मर्यादा ओलांडली होती. मुख्यमंत्री येणार म्हणून दीड तास अगोदर येथील चारही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले होते. या मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली होती. येथील गृहनिर्माण सोसायट्यांना आपली प्रवेशद्वारे बंद ठेवावी लागली. त्यांच्या गेटसमोर गोविंदा पथकांनी, भाजपा कार्यकर्त्यांनी बिनदिक्कत वाहने उभी केल्याने या सोसायट्यांमधील रहिवाशांना बाहेर पडणे मुश्कील झाले. मुख्यमंत्र्यांना आपला चेहरा दिसावा, याकरिता भाजपाचे आमदार, नगरसेवक यांनी दहीहंडीकडे धाव घेतली होती. मात्र, त्यांनाही पोलिसांनी अडवल्याने हुज्जत घालणे, वाद असे प्रकार सुरू होते. मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर जाऊन फोटो काढून चमकण्याची स्वप्ने भंग पावलेले हे नगरसेवक, पदाधिकारी गर्दीत घाम पुसत केविलवाणे उभे होते. माथाडींचे नेते शिवाजी पाटील यांनी हिरानंदानी मेडोज येथे प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांची हंडी ही शहरातील सर्वात मोठी हंडी ठरली. त्यांनी १० थर लावणाºया पथकाला २५ लाखांचे बक्षीस देऊ केले होते. अगोदरच गोविंदा पथकांच्या बसगाड्या, भाजपा आमदार, नगरसेवक, पदाधिकाºयांची वाहने यांनी हा परिसर जॅम असताना रहिवाशांनाही आपापली वाहने दूरवर सोडून जाण्याची सक्ती पोलिसांनी केल्याने पोलीस व रहिवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे आमदार संजय केळकर आणि गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. केळकरांना काहीशी धक्काबुक्की झाली. भाजपाचे नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे आदींसह महिला नगरसेविकांनी स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी पोलिसांशी हुज्जत घालत काढता पाय घेतला.
या मंडळाने अख्खा रस्ताच बंद केल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे टीएमटीच्या बसची वाहतूक वळवण्यात आली होती. रुग्णालय व्यवस्थापनाला दोन तातडीच्या शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या.
काही ठरावीक उत्सवांसाठी ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत मर्यादेतून सूट देण्यात येते. परंतु, दहीहंडी उत्सवात ती सूट दिलेली नाही. तसे पत्रक ठाणे जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना ध्वनिप्रदूषणाबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
परंतु, स्वामी प्रतिष्ठानच्या हंडीत मुख्यमंत्र्यांबरोबर जिल्हाधिकारी व पोलीस आणि पालिका आयुक्त हजर होते व आपणच काढलेल्या आदेशांवर फिरणारा वरवंटा त्यांनी याचि देही, याचि डोळा पाहिला. त्यामुळे कारवाई होणार का, असा प्रश्न आता रहिवासी उपस्थित करत आहेत.