मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ज्येष्ठ महोत्सव, श्रीराम बोरकर यांना कृतार्थ जीवन पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:42 PM2019-03-03T16:42:32+5:302019-03-03T16:44:31+5:30

ज्येष्ठ महोत्सवात ज्येष्ठरत्न, सेवारत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

In the presence of dignitaries, Rangala received the Krittha Jeevan Award for the Jyaththa Festival, Shriram Borkar | मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ज्येष्ठ महोत्सव, श्रीराम बोरकर यांना कृतार्थ जीवन पुरस्कार प्रदान

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ज्येष्ठ महोत्सव, श्रीराम बोरकर यांना कृतार्थ जीवन पुरस्कार प्रदान

Next
ठळक मुद्देमान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ज्येष्ठ महोत्सवश्रीराम बोरकर यांना कृतार्थ जीवन पुरस्कार प्रदानज्येष्ठरत्न, सेवारत्न पुरस्कारांचे वितरण

ठाणे : निर्लेप वृत्ती ज्येष्ठांमध्ये, श्रेष्ठांमध्ये असते. नमस्कार बरोबरीच्या लोकांना करतात पण वंदन ज्येष्ठांनाच करतात. अशी वंदनीय मंडळींचा हा सोहळा आहे. आपली संस्कृती ही ज्येष्ठांचा सन्मान करणारी आहे. कारण ज्याला भूगोल आहे आणि इतिहास आहे तिथेच संस्कृती नांदत असते. अशा ज्येष्ठ माणसांमुळेच संस्कृती टिकून असते असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार आणि साहित्यिक अशोक बागवे यांनी केले. 

      ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यास क्रिएशन्स्ने आयोजित 19व्या ज्येष्ठ महोत्सवात ते बोलत होते. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेेकर, ज्येष्ठ खगोलतज्ञ दा. कृ. सोमण, मधुकरराव कुलकर्णी, व्यास क्रिएशन्स्चे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर उपस्थित होते. ज्येष्ठांच्या आयुष्याची संध्याकाळ आनंदात आणि समाधानात जावी या मुख्य उद्देशाने प्रतिवर्षी या ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठांना सेवारत्न आणि ज्येष्ठरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीत व्यास क्रिएशन्स् चा हा मानाचा सोहळा असतो. मी ठाणेकरच असल्यामुळे मला विशेष अभिमान आहे. ज्येष्ठांचे आरोग्य, त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने मी कायम प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिली. यंदाचा कृतार्थ जीवन पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर यांना प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुस्तकांचा संच असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संस्कृतच्या अध्यापिका आणि ज्ञानदानाचे कार्य करीत असलेल्या 92 वर्षांच्या लीलाताई श्रोत्री यांचा यावेळी विशेष संवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यात्मातील नऊ कारणांमुळे आपण सारे ज्येष्ठ आनंदी आहात, व्यास क्रिएशन्स् आयोजित या मेळाव्यामुळे आपण आनंदात अधिकाधिक भर पडत असते, हे निश्चितच अभिनंदनीय आहे, असे कौतुकास्पद प्रतिपादन दा. कृ. सोमण यांनी केले.

       कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात ज्येष्ठ अभिनेते राम पटवर्धन, अभिनेत्री आणि संवादिका दीप्ती भागवत, शिवसेना नेते अनंत तरे, भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, अनिल कासखेडीकर, आसावरी फडणीस, शामसुंदर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर लिखित आणि व्यास क्रिएशन्स् प्रकाशित नावात दडलंय काय! या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेे. जुन्या ठाण्याची नव्या पिढीला ओळख करून देणारा हा ऐतिहासिक दस्तावेज आहे, तो प्रत्येक ठाणेकरांच्या संग्रही असलाच पाहिजे, असे मत अनंत तरे यांनी व्यक्त केले. व्यास क्रिएशन्स्ने खास ज्येष्ठांसाठी आयोजित केलेल्या लेखनस्पर्धेचेही बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. डॉ. श्रीकांत होटे, विद्या खानखोजे, शेखर बर्वे, सुभाष जोशी, नंदा पवार यांना बक्षीसे देण्यात आली. ज्येष्ठ कलावंत रवि पटवर्धन आणि अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्रीरंग खटावकर, धनश्री करमरकर,महेश शानभाग यांनी पोपटी चौकटी हे नाटय अभिवाचन सादर  केले. प्रारंभी नुपूर विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी गीतवंदना सादर केली. कार्यक्रमाची सांगता साधना जोशी यांच्या स्वातंत्र्यवीर माई सावरकर या कार्यक्रमाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे साधना जोशी यांनी बहारदार निवेदन केले. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

Web Title: In the presence of dignitaries, Rangala received the Krittha Jeevan Award for the Jyaththa Festival, Shriram Borkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.