ठाण्यातील अभिनय कट्टयावर "मी टू" चे सादरीकरण, कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:18 PM2018-10-22T15:18:51+5:302018-10-22T15:25:38+5:30
४०० व्या कट्ट्याकडे यशस्वीरीत्या वाटचाल करणाऱ्या अभिनय कट्टयावर नवनवीन प्रयोग सादर केले जात आहेत.
ठाणे : दर आठवड्याला प्रेक्षकांना एका नवीन विषयावर सादरीकरण पाहायला मिळत आहे. त्यात आणखीन भर पडली ती "मी टू" नाटकाची. ३९९ क्रं च्या कट्ट्यावर हे नाटक सादर झाले व कट्ट्याच्या कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
"आजची जिजाऊ" या सादरीकरणातून पूर्वीची स्त्री आणि आताची स्त्री यांच्यातील तफावत दाखवण्यात आली. आताच्या महिला मुलाना संस्कार करण्यात कश्या कमी पडतात हे यात दाखवण्यात आले. यात शिवानी देशमुख,प्रतिभा घाडगे,अजित भोसले,अमित महाजन या कलाकारांनी काम केले. "अपेक्षा" या सादरीकरणाच्या माध्यमातून आई वडिलांच्या मुलांकडून असणाऱ्या शैक्षणिक,व्यवहारिक अपेक्षा दाखवण्यात आल्या. या अपेक्षेच्या ओझ्यामुळे मुलांना होणारा मानसिक त्रास,व मुले कसे भरकटतात हे मांडण्यात आले. ओमकार मराठे,कुंदन भोसले,वैभव पवार,रोहिणी राठोड यांनी काम केले. "अवनी" या सादरीकरणातून सध्या सुरू असलेली जंगल तोड व जंगलात वाढलेले कॉन्क्रीट चे जंगल यावर भाष्य करण्यात आले.कोर्टाने अवनी वाघिणीला मारायचा निर्णय दिला असून ही वाघीण नर भक्षक असून तिने अनेकांचा जीव घेतला आहे असे आरोप आहेत.मात्र तिच्यावरील हे आरोप अद्याप सिद्ध झाले नसून तिच्या बचावाच्या समर्थनार्थ प्राणीमित्र पुढे आले आहेत.सहदेव कोळंबकर,न्यूतन लंके,लवेश दळवी,प्रथमेश यादव यांनी यात काम केले होते. सध्या मी टू या मोहिमेने वेग घेतला असून बॉलीवूड मध्ये उठसूठ कोणीही आरोप करत आहेत.या आरोपात तथ्य आहे का?त्या मागचा मूळ उद्देश काय आहे. आणि आरोपात तथ्य असेल तर आरोपीली शिक्षा व्हावी असे यात दाखवण्यात आले.ऑफिस,घर अथवा नातेवाईक यांच्याकडुन देखील असा मानसिक त्रास दिला जातो.याला विरोध म्हणजेच मी टू हि चळवळ होय.यात कुणाल पगारे,मौसमी घाणेकर,रोहिणी थोरात,प्रथमेश मंडलिक,शुभांगी भालेकर,उत्तम ठाकूर यांनी काम केले. यावेळी कट्ट्याचे निवेदन सहदेव साळकर याने केले. दीपप्रज्वलन विष्णू उंबरसाडे यांनी केले. विविध विषयांना हात घालून तो विषय अभ्यास करून मुद्देसूद प्रेक्षकांसमोर मांडणे हि कट्ट्याच्या कलाकारांची खासियत आहे असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले.