ठाण्यातील संगीत कट्टयावर "भावगीतातील सूर"चे सादरीकरण, कानिरा आर्टस या संस्थेतर्फे कार्यक्रम सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 03:46 PM2018-11-24T15:46:28+5:302018-11-24T15:48:30+5:30
कानिरा आर्टस या संस्थेतर्फे "भावगीतातील सूर" हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
ठाणे : गेल्या वर्षभरापासून संगीत कट्टा रसिकांना नवनवीन गाण्यांची मेजवानी देत आहे.अनेक दर्जेदार कार्यक्रम येथे सादर होत आहेत.त्यातच भर पडली आहे ती भावगीतांच्या सादरीकरणाची.कानिरा आर्टस या संस्थेतर्फे "भावगीतातील सूर" हा कार्यक्रम सादर करण्यात आला.यंदाचा हा २६ क्रं चा कट्टा होता.
या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर,श्रीनिवास खळे, यशवंत देव,श्रीधर फडके,अनिल अरुण तसेच अनेक सुप्रसिद्ध गायक,गीतकार,संगीतकार यांची अजरामर गाणी सादर करण्यात आली.यावेळी तिन्ही सांजा सखे मिळाल्या,तुझे गीत गण्यासाठी,डोळ्यावरून माझ्या,कधी रिमझीम झरणारा,जेव्हा तुझ्या बटांना,लाजून हासणे,भातुकलीच्या खेळामधली,शुक्रतारा मंद वारा,या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे इत्यादी गाणी सादर करत गायकांनी प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात नेले. यात नितीन श्री,पराग पौनीकर,वृषाली घाणेकर यांनी गाणी सादर केली.संतोष मोहिते याने संगीत संयोजक म्हणून काम पाहिले,रितेश पाटील याने तबला वाजवत रसिकांची मने जिंकली.आनंद रेवनकर,सदाशिव रेवनकर,ईशान रेवनकर यांनी सह संगीत संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.नेहा पेडणेकर यांनी या भक्तिमय कार्यक्रमाचे निवेदन करत एका एका गाण्याचा भाव उलघडण्याचे काम लीलया पेलले. जेष्ठ प्रेक्षक जोशी आजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अश्या पद्धतीच्या कार्यक्रमामुळे आनंद मिळतो,संगीत कट्टयावर असे कार्यक्रम नेहमी व्हावेत अशी इच्छा एका प्रेक्षकाने व्यक्त केली. संगीतातून मनाला मिळणारी समाधानाची अवस्था, हीच सर्व श्रेष्ठ अस्वस्था असू शकते.आपण सगळे या संगीताच्या वारीतील वारकरी आहोत,हि वारी आपण अशीच सुरु ठेवून अध्यात्म्याला संगीताची जोड देऊन जगू या अश्या भावना अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी व्यक्त केल्या.