समाजातील विविध विषयांवर भाष्य करणारे "नाट्यरंग" अभिनय कट्ट्यावर सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 02:14 PM2018-10-08T14:14:13+5:302018-10-08T14:17:59+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर नाट्यरंग सादर करून समाजातील विविध विषयांवर भाष्य करण्यात आले.
ठाणे : नाटक हे प्रबोधनाचे प्रबळ माध्यम आहे ,हे ३९७ क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर नाट्यरंग ने दाखवून दिले.४०० व्या ऐतिहासिक कट्ट्याकडे वाटचाल करीत शेवटच्या टप्प्यातील प्रत्येक सादरीकरण हृदयाला भिडणारी होत आहेत. नाट्यरंग मध्ये समाजातील विविध विषय द्वीपात्रीच्या माध्यमातून अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी मांडण्याचा प्रयत्न केला.
राजकारणावर भाष्य करणारी आजचे राजकारण हि द्विपात्री प्रथमेश यादव व वैभव पवार यांनी सादर केली. प्रॉपर्टीसाठी आपल्या वडिलांना एअरपोर्टवर सोडून संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर करून मुलगा अमेरिकेला पसार झाला,हि घटना माणुसकीचा अंत या द्विपात्रीतून कुंदन भोसले व प्रथमेश मंडलिक यांनी मांडली. माणूस बदलत गेला त्या प्रमाणे इतिहास हि बदलला या विषयावर आधारित बदललेला इतिहास हि द्विपात्री ओमकार मराठे व शुभांगी भालेकर यांनी सादर केली. कोणतीहि घटना घडली कि सरकार त्याचे खापर विरोधी पक्षावर फोडते,अशी ही आरोप प्रत्यारोपाची ह्यात विरोधी पक्षाचा हात हाय हि द्विपात्री सहदेव साळकर व वैभव जाधव यांनी सादर केली.शहरीकरण प्रचंड वाढले असून ग्रामीण भागच जगण्यासाठी योग्य आहे यावर आधारित गड्या गावंच बरा हि द्विपात्री धनेश चव्हाण व उत्तम ठाकूर यांनी सादर केली.कुणाल पगारे व रोशनी उंबरसांडे यांनी नृत्यावर आधारित नाच नाच श्वास हि द्विपात्री सादर केली. वाढती महागाई व पेट्रोलचे गगनाला भिडलेले भाव यावर आधारित पेट्रोल दरवाढ द्विपात्री माधुरी कोळी व हेमंत यादव यांनी सादर केली. या कार्यक्रमात न्यूतन लंके व रोहिणी थोरात यांनी सादर केलेल्या कॅन्सरवर मात या द्वीपात्रीस प्रथम पारितोषिक मिळाले. सहदेव कोळंबकर व साक्षी महाडिक यांनी समाज हि द्विपात्री सादर करत समाजातील वाईट गोष्टींवर भाष्य केले.प्रकाश आमटे यांनी समाजासाठी केलेल्या थोर कामाची आठवण या द्विपात्रीतून करून देण्यात आली.या द्वीपात्रीस द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
शिल्पा लाडवंते हिने लावणी सादर करत रसिकांची मने जिंकली व शिल्पा ने पॉलीसी हि एकपात्री देखील सादर केली.रुक्मिणी कदम यांनी "बुढा मिल गया" हे नृत्य सादर केले व एअर हॉस्टेज हि एकपात्री देखील सादर केली.अतिश जगताप याने भिकू हि एकपात्री सादर केली.अजित भोसले याने शेतकाऱ्यांची आत्महत्या हि एकपात्री सादर केली.रोहित सुतार याने धरणी माय हि एकपात्री सादर केली.सई कदम हिने मी अहिंसा बोलतेय हि एकपात्री सादर करत समाजात वाढलेल्या हिंसेबद्दल भाष्य केले. तसेच यावेळी परेश दळवी याने ये जिंदगी का सफर हे मुकनाट्य सादर करत सध्या समाजातील अस्थिरता,वाढती गुन्हेगारी, अंधश्रद्धा या विषयांवर भाष्य केले.कार्यक्रमाचे निवेदन कल्पेश डुकरे याने केले.कदिर शेख यांनी द्वीपात्री स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केले.द्वीपप्रज्वलन दिगंबर सावंत व अपर्णा सावंत यांनी केले. कलाकार सक्षम,समृद्ध व्हावा या उद्देशानेच आम्ही कट्ट्याच्या कलाकारांना द्विपात्रीसाठी असे विषय सुचवले.कलाकारांनी देखील अतिशय प्रामाणिकपणे व अभ्यास करून हे विषय हाताळले .एका हि कलाकाराने आम्हाला हे जमणार नाही अशी तक्रार केली नाही.कारण युद्धातून पाठ फिरावणारा हा योद्धा नसतो, जो शेवटपर्यंत मैदानात थांबतो तोच खरा योद्धा असतो अश्या शब्दात अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले.