येऊर पर्यटन केंद्राचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर, दोन महिन्यात कामला होणार सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:20 PM2018-12-10T15:20:35+5:302018-12-10T15:23:30+5:30
येत्या दोन महिन्यात येऊर येथील पर्यटन स्थळ विकसित करण्याचे सोपास्कार पार पाडल्यानंतर प्रकल्पाला खºया अर्थाने सुरवात होणार आहे. या प्रकल्पामुळे येथील आदीवासी बांधवांना रोजगारसुध्दा उपलब्ध होणार आहे.
ठाणे - येऊर येथील सुमारे ८९६२ चौ.मी. जमिनीवर वन खात्याच्या आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘‘पर्यटनस्थळ’’ विकसित करून पर्यटकांना आकर्षण ठरेल असे ‘‘निसर्ग उद्यान’’ व आदिवासी समाजाची जीवनशैली दाखवणारे ‘‘आदिवासी संस्कृती कला केंद्र’’ उभारण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिकेने केलेला तयार केलेला पर्यटन केंद्राचा प्रस्ताव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांच्याकडे महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सादर केला. त्यामउळे आता खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.
सर्वसामान्य पर्यटकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी अशाप्रकारचे केंद्र उभारल्यास आदिवासी बांधवांना या केंद्राच्या माध्यमातून वेगळी दिशा मिळून, मूळ आदिवासी संस्कृतीबद्दल लोकांना माहिती मिळू शकणार आहे. तसेच हे पर्यटन केंद्र विकसित करत असताना मूळ आदिवासी संस्कृती जपण्यासाठी त्यांचे राहणीमान, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांचा तारपा सारखा नृत्याविष्कार, त्यांना अवगत असलेली वारली पेंटिंग सारखी कला व इतर विविध क्षेत्रात आदिवासी बांधव ज्या कलांमध्ये परंपरागत आहेत, त्या सर्व कलांना प्रोत्साहन देण्याचे काम या केंद्रातून करता येणार आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अन्य अभयारण्याच्या धर्तीवर येऊर येथील निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, शालेय विद्यार्थ्यांना पशु, पक्षी, वनस्पती तसेच आदिवासी संस्कृतीची माहिती मिळावी याकरिता शैक्षणिक दृष्टीने विकसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येऊर येथील डोंगरकड्या लगत वर्षातील ३६५ दिवस पाणी साठून तलाव निर्माण झाले असून या तलावात बोटिंग तसेच पर्यटनाच्या दृष्टीने इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याचे माहिती या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
त्यानुसार सोमवारी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पर्यटन केंद्रामुळे येऊर येथील आदिवासींना रोजगार सुध्दा होणार असून या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या उत्पनाचा स्त्रोत देखील वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता वनखात्याच्या परवानगी नंतर लवकरच येथील कामाला सुरवात होणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांनी एका महिन्याच्या आत वनखात्याची कार्यालयीन कायदेशीर परवानगी पुर्ण करून घेण्याची जबाबदारी घेतल्याने येऊरच्या पर्यटन केंद्राच्या कामाला आता गती प्राप्त झालेली असून दोन महिन्यामध्ये या प्रकल्पाला सुरवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.