विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विज्ञान प्रकल्प सादर, भाभा अणु केंद्राचे वैज्ञानिक डॉ. विवेक पारकरांनी केलं कौतुक
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 11, 2022 03:32 PM2022-10-11T15:32:57+5:302022-10-11T15:36:44+5:30
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच भविष्यातील शास्त्रज्ञ ठाणे शहरातून घडावेत या उद्देशाने रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
ठाणे - आर्किटेक्चर, कोडिंग, सिक्युरिटी, इंडियन स्पेस रिसर्च ऑगनाईझेशनचा प्रकल्प अशा विविध विषयांना हात घालणारे प्रकल्प प्रदर्शनात विज्ञानप्रेमींना पाहता आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून सादर झालेल्या या प्रकल्पांना मान्यवरांची कौतुकाची थाप मिळाली. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी हे प्रदर्शन भरले असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच भविष्यातील शास्त्रज्ञ ठाणे शहरातून घडावेत या उद्देशाने रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच आंतर महाविद्यालयीन विज्ञान प्रदर्शन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन भाभा अणु केंद्राचे वैज्ञानिक डॉ. विवेक पारकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे, प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, उपप्राचार्या दिपीका तलाठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध नाविण्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले होते. गेली ११ वर्षे हे प्रदर्शन ज्युनियर कॉलेज मध्ये भरत आहे. यावर्षी ११ ज्युनियर कॉलेज विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. यावेळी प्रदर्शनाची माहिती प्राचार्या डॉ. हर्डीकर यांनी दिली. वैज्ञानिक डॉ. पारकर यांनी विज्ञान प्रदर्शनाची पहाणी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, मुलांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शनात मांडले आहेत. ही स्पर्धा नसून प्रदर्शन आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने इतरांचे पण प्रकल्प पहावे. त्यामुळे विचारांची देवघेव होईल. त्यामुळे नक्कीच वैज्ञानिक पिढी निर्माण होईल. डॉ. भगुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्याची महाविद्यालयाने दिली आहे. या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी चांगले प्रकल्प सादर केले आहेत. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर हे प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनासाठी प्राचार्या डॉ. हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांसमवेत प्रचंड मेहनत घेऊन हे प्रदर्शन भरवल्याची माहिती विलास ठुसे यांनी दिली.