अध्यक्ष स्वखर्चाने संमेलनाला जाणार, स्वखर्चाने संमेलनाला जाणार:अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:15 AM2017-12-18T01:15:42+5:302017-12-18T01:16:01+5:30
संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्य संमेलन भपकेबाज नसावे. तेथे केवळ जेवणावळी घातल्या जाऊ नयेत. साहित्यिकांनी संमेलनासाठी मानधन मागणे व संमेलनासाठी गाडी खर्च मागणे, हा मुद्दा रास्त नाही. मी देखील स्वखर्चानेच साहित्य संमेलनाला जाणार आहे, अशी माहिती बडोदा येथे होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्य संमेलन भपकेबाज नसावे. तेथे केवळ जेवणावळी घातल्या जाऊ नयेत. साहित्यिकांनी संमेलनासाठी मानधन मागणे व संमेलनासाठी गाडी खर्च मागणे, हा मुद्दा रास्त नाही. मी देखील स्वखर्चानेच साहित्य संमेलनाला जाणार आहे, अशी माहिती बडोदा येथे होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.
आगरी युथ फोरमने डोंबिवली क्रीडासंकुलात भरवलेल्या पंधराव्या आगरी महोत्सवात मराठी भाषेवर आधारित परिसंवाद गुरुवारी झाला. याप्रसंगी देशमुख उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पडून आहे. तो मंजूर व्हावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे देशमुख पुढे म्हणाले. न्यायालयाचे कामकाज मराठीतून का होत नाही, याबाबत ते म्हणाले, जिल्हापातळीवरील न्यायालयात दावे, अर्ज मराठीतून स्वीकारले जातात. सर्वच काही निराशाजनक स्थिती नाही. मराठी ही व्यवहाराची भाषा व्हावी, यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. मराठी शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रस्थ वाढत आहे. मराठीची सक्ती केल्यावर सरकार व पालक त्याचा किती अवलंब करतील, याविषयी साशंकता असून इंग्रजीबरोबर मराठीची सक्ती हा विचार मराठीच्या वाढीस योग्य ठरेल, असे ते म्हणाले. देशमुख यांच्या या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे लक्ष आहे.