‘सूर्याेदय’चे अध्यक्ष, सचिव बडतर्फ
By admin | Published: August 6, 2015 02:54 AM2015-08-06T02:54:30+5:302015-08-06T02:54:30+5:30
महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्याचा ठपका ठेवून येथील सूर्याेदय को. आॅप. हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची
बदलापूर : महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतल्याचा ठपका ठेवून येथील सूर्याेदय को. आॅप. हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्षा शोभा शेट्टी आणि सचिव नरेंद्र काळे यांना आपल्या पदांपासून दूर राहावे लागणार आहे.
अंबरनाथ पूर्व भागात १०० एकर जागेवर ६३० प्लॉटची सूर्याेदय सोसायटी उभारण्यात आली होती. स्थापनेच्या वेळी ती आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी म्हणून नावारूपाला आली. मात्र, तिच्या प्लॉटधारकांनी शर्तभंग करून या जागेवर इमारती उभारल्या होत्या. त्यामुळे या सोसायटीच्या जागेवरील खरेदीविक्री व्यवहारावर शासनाचे निर्बंध आहेत. हा विषय सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता सोसायटीच्या कामकाजावरच आक्षेप घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार सूर्याेदय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुदतीत घेणे, हे संस्थेला बंधनकारक होते. मात्र, संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी १४ आॅगस्ट २०१२ पूर्वी कार्यालयाकडून रीतसर मुदतवाढ घेतली नाही.
त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, या आदेशाविरोधात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना सोसायटीच्या अध्यक्ष शेट्टी आणि सचिव काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक एल.एस. लष्कर यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या पदांसाठी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे शेट्टी आणि काळे यांना आपल्या पदांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात नरेंद्र काळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमचे पद काढण्यात आले असले तरी कमिटीचे सदस्य म्हणून आम्ही कायम राहणार आहोत. (प्रतिनिधी)