ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कदम यांच्यासह सात पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 10:20 PM2021-01-25T22:20:24+5:302021-01-25T23:07:19+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांच्यासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपतीचे पदक जाहीर झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांच्यासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपतीचे पदक जाहीर झाले आहे. सहायक आयुक्त कदम यांना दुसऱ्यांदा हे पदक जाहीर झाले असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात येणार आहे.
ठाणे शहर तसेच मुंबई पोलीस दलात उत्कृष्ठ कामगिरी करुन ३३ वर्षांच्या सेवेत २५० हून अधिक बक्षीसे कदम यांनी मिळविली आहेत. त्यांना यापूर्वीही २००९ मध्ये पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे. त्याबरोबरच नव्यानेच ठाणे आयुक्तालयात नियुक्ती मिळालेल्या सहायक पोलीस आयुक्त संगीता शिंदे- अल्फान्सो, निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, उल्हासनगर गुन्हे शाखेचे जमादार उदयकुमार पलांडे, ठाणे मुख्यालयाचे जमादार थॉमस डिसोझा आणि खंडणी विरोधी पथकातील जमादार सुरेश मोरे यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पोलीस कवायत मैदानावर मंगळवारी सन्मानित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.................
* सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांना १३ वर्षापूर्वी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले आहे. त्यापाठोपाठ विशेष सेवेबद्दल दुसºयांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे आपला आनंद द्वीगुणित झाला असून चांगल्या सेवेचे योगदान दिल्याची ही पोच पावती मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
* मुंबई दहशतवाद विरोधी पथकात निवृत्ती कदम हे कर्तव्यावर असताना, त्यांनी पुण्यातील जर्मन बेकरी आणि मुंबईतील झवेरी बाजार बॉम्बस्फोटांच्या तपासात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात हॉटेल ताज, ओबेरॉय नरीमन हाऊसमध्ये पकडलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या संभाषणात अडथळा आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. खंडणी विरोधी पथकात असताना, त्यांनी सुमारे १५० फरार आरोपींच्या मुसक्या आवळत ३५ खंडणी खोरांसाहित ४६ घातक शस्त्र आणि ११० काडतुसे जप्त केली होती.