गडकरी कट्ट्यावर पत्रकार परिषदांना बंदी; महापालिकेचा फतवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:11 AM2019-09-27T00:11:35+5:302019-09-27T00:11:47+5:30
महापालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा
ठाणे : ठाणे महापालिकेची वास्तू असलेल्या गडकरी रंगायतनमध्ये मागील कित्येक वर्षांपासून येथील कट्ट्यावर विविध स्वरूपाच्या पत्रकार परिषदा घेतल्या जात होत्या. मात्र, आता महापालिकेची बदनामी होईल, अशा पत्रकार परिषदा घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्रकच महापालिकेच्या आस्थापना विभागाने गडकरी कट्टा उपाहारगृहाला दिले आहे.
गडकरी कट्टा हा पत्रकार परिषदांना नेहमी मोक्याचे ठिकाण समजले जात होते. कित्येक वर्षांपासून येथे महापालिकेच्या विरोधातील विषय असो किंवा इतर कोणत्याही विषयावर या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या जात होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच पालिकेने फतवा काढला असून गडकरी कट्टा पत्रकार परिषदेसाठी उपलब्ध करून देण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले आहे.
पालिकेने त्याचे कारण आता स्पष्ट केले आहे, त्यानुसार गडकरी रंगायतन ही महापालिकेची वास्तू आहे. त्यामुळे येथे अनेकदा पालिकेविरोधात किंवा प्रशासनावर टीका करणाऱ्या पत्रकार परिषदा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळेच यापुढे अशा पत्रकार परिषदांना परवानगी देऊ नये, असे आस्थापना विभागाने गडकरी कट्टा उपाहारगृहाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
विशेष म्हणजे कमी खर्चात हे उपाहारगृह उपलब्ध होत होते. परंतु, काही महिन्यांपासून महापालिकेविरोधात टीका सुरू आहे. तसेच पालिकेचे काही प्रकल्प, क्लस्टर आदींसह इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांवरून पालिकेवर टीकाही केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे मतदाता जागरण अभियान तेथे क्लस्टरविरोधात पत्रकार परिषद घेणार होते. परंतु, त्यांना परवानगी नाकारण्यात आली.