बेकायदा शस्त्रप्रकरणी तपास यंत्रणेवर थेट दिल्लीहून दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:41 AM2019-01-22T00:41:43+5:302019-01-22T00:42:05+5:30
डोंबिवली भाजपा पूर्व मंडळ उपाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णीच्या प्रकरणात तपासयंत्रणेवर थेट दिल्लीतून दबाव आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
कल्याण : बेकायदा शस्त्रांची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला डोंबिवली भाजपा पूर्व मंडळ उपाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता धनंजय कुलकर्णीच्या प्रकरणात तपासयंत्रणेवर थेट दिल्लीतून दबाव आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचा दावा गुन्हे शाखेचे अधिकारी करत असले, तरी आतापर्यंतच्या तपासात काय उघड झाले, याबाबत मात्र त्यांना काहीही सांगता न आल्याने राजकीय दबावाच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.
मानपाडा रोड परिसरातील ‘तपस्या हाउस ऑफ फॅशन’ नावाच्या दुकानात शस्त्रांचा साठा करून तो विकणाऱ्या कुलकर्णीला १४ जानेवारी रोजी कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चॉपर, तलवारी, कुकरी, गुप्ती, सुरे, कु-हाडी, कोयता, एअरगन, बटणचाकू, फायटरसह एक लाख ८६ हजार रुपयांचा १७० शस्त्रांचा साठा आढळला.
कुलकर्णी हा भाजपाचा पदाधिकारी, तसेच संघाचा कार्यकर्ता असल्याने, या प्रकरणात अटकेपासूनच पोलिसांवर राजकीय दबाव होता, अशी चर्चा आहे. त्यामुळेच एवढा मोठ्या प्रमाणात बेकायदा शस्त्रसाठा मिळूनही कुलकर्णीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे कुलकर्णीने शस्त्रे कुठून आणली, आतापर्यंत कोणाकोणाला विकली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहिली.
प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणी ऊहापोह झाल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयाकडे धाव घेतली. त्यावर शनिवारी सुनावणी झाली आणि कुलकर्णीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तपास पुढे सरकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाल्याचे दिसत नाही. राजकीय दबावामुळे पोलिसांच्या तपासावरच पाणी फिरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आरोपीची कोठडी मिळूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागू नये, यासाठी पोलिसांवर थेट दिल्लीहून दबाव आल्याचे बोलले जात आहे.
>कोठडीची मुदत आज संपणार
कुलकर्णीच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने, त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणेकडून पुन्हा पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी किंवा लगेच जामीनही मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून खंडण
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांवर दबाव असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. कुलकर्णीची चौकशी सुरू असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. मात्र, आतापर्यंतच्या तपासातून काय उघड झाले, याबाबत त्यांनी मौन बाळगले.