वाहतूक पोलिसांवर कारवाईवेळी दबाव
By admin | Published: March 15, 2017 02:20 AM2017-03-15T02:20:05+5:302017-03-15T02:20:05+5:30
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना बहुतांशी वेळा पोलिसांवर लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठांचा दबाब येतो
डोंबिवली : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना बहुतांशी वेळा पोलिसांवर लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठांचा दबाब येतो. हे योग्य नाही. शहरात ठिकठिकाणी कोंडी जरी होत असली तरीही वाहतूक पोलीस सूपरमॅन नाहीत. नागरिकांनी उपोषणापेक्षा वाहतूक पोलिसांच्या समस्या विचारात घेऊन त्यांना ‘पोलीस मित्र’ म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण वाहतूक विभागाचे अधिकारी बाळासाहेब आव्हाड यांनी येथे केले.
शहरातील कोडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस ठोेस उपाययोजना करत नसल्याने नगरसेवक मंदार हळबे यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर रविवारी बोडस मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आव्हाड बोलत होते.
ते म्हणाले की, नागरिकांनी वाहनांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. त्याउलट चालवण्यावर भर द्यावा. आधीच या शहरातील रस्ते अरुंद आहेत. तर वाहने अधिक आहेत. इंदिरा गांधी चौकात कारवाईच्या वेळी लायसन्स तपासले, पण केवळ ५० टक्केच रिक्षाचालक दिसले. अन्य कुठे गेले, अशा वेळी नागरिकांच्या सतर्कतेची, जागृतीची अपेक्षा असते. पण तसे होत नाही. रेल्वे स्थानक परिसरातून पाच नागरिक वावरतात. कोंडीमुळे तेथे त्यांची गैरसोय होते. पण तेथील जाग वाढत नसून, लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तसेच तेथील फेरीवाल्यांवरही सातत्याने कारवाई व्हायला हवी. त्यासाठी महापालिकेलाही जाब विचारायला हवा. ठाकुर्लीचा उड्डाणपूल वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही, असे ते म्हणाले.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी गोविंद गंभीरे यांनीही त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. सध्या कागदोपत्री २३ अधिकारी-कर्मचारी आहेत. परंतु, विविध कारणांमुळे दिवसाला १२ कर्मचारी उपस्थित असतात. नागरिकांनी पोलीस मित्र म्हणून पुढे यावे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा फटका वाहतुकीला बसत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करताना अडचणी येतात. पण तरीही कोणतीही टीका-टिपण्णी न करता, कारणे न देता माझे सर्व कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत. सध्या आणखी एका टोइंग व्हॅनची गरज आहे. त्यासाठी हळबे यांनी १० लाखांचा निधी देण्याचे म्हंटले तरी तसा निधी घेता येत नाही. त्यासाठी त्यांनी ठाण्यातील वरिष्ठांना साकडे घालावे, असे गंभीरे म्हणाले.
या बैठकीचे अध्यक्ष पी. जी. कुलकर्णी यांनी, वाहतूक नियंत्रणाची कौशल्ये सांगितली. शहरात सिग्नलचे जाळे नाही, ही शोकांतिका आहे. रेल्वेचे सिग्नल बिघाडल्यास सर्वत्र गोंधळ उडतो. पण शहरातील ही यंत्रणा तीन वर्षे बंद असूनही काहीच हालचाल होत नाही. यावरूनच या शहरातील नागरिक व पोलीस किती सतर्क आहे, हे लक्षात येते. सिग्नलसाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)