माघार घेण्यासाठी दबावतंत्र; केडीएमटी निवडणूक, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:47 AM2019-02-11T02:47:40+5:302019-02-11T02:47:55+5:30
केडीएमसीतील शिवसेनेचे संख्याबळ पाहता शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे परिवहन सदस्य म्हणून निवडून जाऊ शकतात. पण, पक्षाने दिलेल्या तीन उमेदवारांसह कल्याण पूर्वेतील शाखाप्रमुख गणपत घुगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कल्याण : केडीएमसीतील शिवसेनेचे संख्याबळ पाहता शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे परिवहन सदस्य म्हणून निवडून जाऊ शकतात. पण, पक्षाने दिलेल्या तीन उमेदवारांसह कल्याण पूर्वेतील शाखाप्रमुख गणपत घुगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी घुगे यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबावतंत्र अवलंबले जाण्याची शक्यता आहे. घुगे यांना नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि महेश गायकवाड यांचे सूचक आणि अनुमोदन मिळाले आहे.
परिवहनच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १० जणांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण, अर्ज छाननीप्रक्रियेत भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रशांत माळी यांचा अर्ज सूचक व अनुमोदक नगरसेवक नसल्याने बाद झाला. त्यामुळे निवडणूक रिंगणात नऊ उमेदवार आहेत. यामध्ये शिवसेनेचे सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील, गणपत घुगे, तर भाजपाचे संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर, मनसेचे मिलिंद म्हात्रे आणि काँग्रेसचे गजानन व्यापारी यांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी ३ ते साडेपाच या कालावधीत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे माघार कोण घेतो की, उमेदवारी अर्ज जैसे थे राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सेनेचे तीन सदस्य परिवहनवर सहजपणे निवडून जाऊ शकतात. त्याप्रमाणे पक्षाने सुनील खारूक, अनिल पिंगळे आणि बंडू पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक शाखाप्रमुख गणपत घुगे यांनीही अर्ज दाखल केल्याने शिवसेनेमध्ये गुरुवारी खडाजंगी झाली होती. त्यामुळे सोमवारी घुगे काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्यासाठी घुगे यांच्यावर दबावतंत्र अवलंबले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात घुगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दबाव असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. उमेदवारी मागे घेणार नाही. मल्लेश शेट्टी आणि महेश गायकवाड यांचा मला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. आपल्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. आमचे सेनेचे तीन उमेदवार सहजपणे निवडून जातात, तर घुगे यांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, सेनेचे तीन की चार उमेदवार निवडणूक रिंगणात असतील, हे सोमवारी स्पष्ट होईल. कोणावरही दबाव नाही, असा दावा कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला आहे.
भाजपा, मनसे, काँग्रेसची कसोटी
प्रत्येक सदस्याला सहा मते देण्याचा अधिकार आहे. भाजपातर्फे तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण, त्यांच्या लोकप्रतिनिधींचे ४७ संख्याबळ पाहता त्यांचे दोन सदस्य समितीवर निवडून जाऊ शकतात.
तिसरा सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांना शिवसेनेसह अन्य पक्षांच्या मतांची आवश्यकता भासणार आहे. पण, शिवसेनेचे चार उमेदवार रिंगणात असल्याने भाजपाला मतांचे सहकार्य मिळेल, अशी शक्यता तूर्तास नाही.
मनसेसह काँग्रेसनेही त्यांचा उमेदवार उभा केला आहे. त्यांनाही अन्य राजकीय पक्षांच्या मतांची आवश्यकता भासणार असून त्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. यामधील कोणाला तरी माघार घ्यावी लागेल, अन्यथा दोघांचाही पराभव अटळ असल्याचे बोलले जात आहे.
...तर वंजारी समाजाची नाराजी भोवेल
शाखाप्रमुख घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेने डावलल्याने वंजारी समाजाची नाराजी आगामी निवडणुकांत सेनेला भोवण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील भागात हा समाज मोठ्या संख्येने आहे. कल्याण वंजारी समाज सेवा मंडळाद्वारे अनेक वर्षे विविध उपक्रम राबवणाºया घुगेंच्या पाठीशी शिवसैनिकांसह वंजारी समाज उभा राहिल्याने शिवसेनेच्या नेतृत्वासमोर आव्हान उभे राहिले आहे.