नामांकित कंपन्यांची बतावणी: कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:39 PM2020-09-25T23:39:11+5:302020-09-25T23:42:00+5:30
कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्याच्या नावाखाली एका फार्मासिटीकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दोन कोटींचे कर्ज मिळवून देण्यासाठी दोन नामांकित कंपन्याच्या नावाखाली एका फार्मासिटीकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची आॅनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपींच्या शोधासाठी एका विशेष पथकाचीही निर्मिती करण्यात आली आहे.
ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील वसंत विहार भागातील ५१ वर्षीय गृहस्थ हे वागळे इस्टेट येथील एका फार्मासिटीकल कंपनीचे उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) आहेत. एका इंग्रजी सायं दैनिकात प्रसिद्ध झालेली ‘पारस फायनान्स’ गव्हर्टमेन्ट अँप्रुव्हल मार्कशिट, अॅग्रीकल्चर, बिझनेस, पर्सनल लोन २४ तासात मिळेल, अशी जाहिरात त्यांनी वाचली होती. ही जाहिरात वाचून त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्र मांकावर संपर्क साधला. हा फोन सुनील चव्हाण नामक व्यक्तीने घेतला. त्याच्याकडे त्यांनी कर्जाबाबतची चौकशी केली. तेंव्हा त्यांनी आवश्यक कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडे केली. त्याने दिलेल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर त्यांनी कागदपत्रेही पाठवली. ती पडताळून तुम्हाला दोन कोटींचे कर्ज मंजूर होईल, असे त्यांना भासविण्यात आले. पण शुल्क लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली या उपाध्यक्षांकडून वेगवेगळया बँक खात्यावर १४ लाखांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढची रक्कम भरली नाही. कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी एका मोठया वित्तीय कंपनीच्या मोबाईल क्र मांकावर संपर्क साधला. तिथेही त्यांच्याकडून अशाच प्रकारे ८७ लाख ५० हजार रुपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. या दोन्ही कथित फायनान्स कंपन्यांनी मिळून जुलै ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीत त्यांच्याकडून सुमारे एक कोटी एक लाख ६४ हजारांची फसवणूक केली. ही फसवणूक झाल्यानंतर त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणूकीबाबतचा अर्ज दिला. याच प्रकरणी चौकशी करुन २१ सप्टेंबर २०२० रोजी चितळसर पोलीस ठाण्यात दोन वित्तीय कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियत्तमा मुठे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.