पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे मंगळसूत्र लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:09+5:302021-05-21T04:43:09+5:30
ठाणे: पोलीस असल्याची बतावणी करून पारसिकनगर कळवा येथील एका ५५ वर्षीय महिलेचे एक लाख २० हजारांचे चार तोळ्यांचे सोन्याचे ...
ठाणे: पोलीस असल्याची बतावणी करून पारसिकनगर कळवा येथील एका ५५ वर्षीय महिलेचे एक लाख २० हजारांचे चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकवरून आलेल्या दोघांनी लुबाडल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पारसिकनगर येथे राहणारी ही महिला १६ मे रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास अमृतअंगण सोसायटीच्या समोरील रिक्षा स्टँड येथून कळवा मार्केट याठिकाणी रिक्षाने जात होती. त्याचवेळी ही रिक्षा राजपार्क या इमारतीच्या समोर आली असता, याठिकाणी रिक्षाच्या पाठीमागून दोघेजण एका मोटारसायकलीवरून तिथे आले. त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून ही रिक्षा थांबवली. पुढे तपासणी सुरू असून, तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बॅगेत ठेवा, असे त्यांना सांगून त्यांचे मंगळसूत्र घेऊन ते बॅगेत पुन्हा ठेवत असल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांनी ते बॅगेत न ठेवता त्यांची फसवणूक करून चेहऱ्यावर मास्क आणि हेल्मेट परिधान करून ते पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. महाजन अधिक तपास करीत आहेत.
......................