नोकरी लागल्याची बतावणी करीत जबरी चोरीसाठी चोरटयांनी केली मोटारसायकलींची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:24 PM2021-08-02T21:24:51+5:302021-08-02T21:27:46+5:30
नोकरी लागल्याची कुटूंबीयांना बतावणी करीत भिवंडीतील दोन तरुणांनी चक्क मोबाईलच्या जबरी चोरीसाठी नविन मोटारसायकली खरेदी केल्या. ठाण्यातील एका वकील महिलेच्याही मोबाईलची त्यांनी जबरी चोरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नोकरी लागल्याची कुटूंबीयांना बतावणी करीत भिवंडीतील दोन तरुणांनी चक्क मोबाईलच्या जबरी चोरीसाठी नविन मोटारसायकली खरेदी केल्या. ठाण्यातील एका वकील महिलेच्याही मोबाईलची त्यांनी जबरी चोरी केली. त्यांच्याकडून १६ मोबाईलसह चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली.
ठाणे न्यायालयात वकिली करणाऱ्या रुपाली अंकोलकर (४९, रा. लोटस गावंडबाग, ठाणे) यांचा मोबाईल २२ जुलै २०२१ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलस्वारांनी हिसकावल्याची घटना ठाणे जिल्हा रुग्णालयाजवळ घडली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी आणि निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या जबरी चोरीच्या प्रकरणात भिवंडीतील अशोकनगर भागातून सागर यादव (२१) आणि हेमंत थानवि (२१) या दोघांना २३ जुलै रोजी अटक केली. त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन, नौपाडा परिसरात तीन तर राबोडीतून एक अशा सहा मोबाईलची जबरी चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून वकील महिलेच्या मोबाईलसह १६ मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा चार लाख दहा हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
* आपण स्विगी या खासगी कंपनीत फूड डिलीवरी करण्याचे काम करीत असल्याची त्यांनी आपल्या कुटूंबीयांना बतावणी केली. याच जॉबसाठी मोटारसायकलची गरज असल्याचे सांगून त्यांनी दोन मोटारसायकलींची खरेदी केली. धक्कादायक बाब म्हणजे हेच चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांनाही ते चोरीचे वाटू नये, यासाठी त्यांना ते बनावट बिल बनवून देत होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या जबरी चोरीच्या गुन्हयांची उकल केली.