ठाणे आयुक्तालयात २०२७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:08 AM2019-04-13T00:08:42+5:302019-04-13T00:08:44+5:30

५१ जणांना केले हद्दपार । एमपीडीएनुसार एक स्थानबद्ध

Prevention of 2027 against Thane Commissioner | ठाणे आयुक्तालयात २०२७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

ठाणे आयुक्तालयात २०२७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

googlenewsNext

जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकसभा निवडणूक निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयातील पाचही परिमंडळांतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोन हजार २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, गंभीर गुन्ह्णांची नोंद असलेल्या ५१ जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून (११ मार्च) ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘आॅल आउट’ या विशेष मोहिमेंतर्गत अनेक गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांतील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाई, कोम्बिंग आॅपरेशन तसेच गुन्हेगारांची पडताळणी करून ही मोहीम राबवण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी लोकमतला सांगितले.


या कालावधीमध्ये १०९१ वेळा मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. कलम १०७ नुसार ११०३, कलम १०९ नुसार ३९२, तर कलम ११० नुसार ५३२ अशा दोन हजार २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले. महाराष्टÑ पोलीस कायदा ५५ नुसार एकाला कल्याणमधून हद्दपार करण्यात आले. कायदा ५६ नुसार ३७, तर कायदा ५७ नुसार १३ जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली. यात कलम ५६ नुसार ठाण्यातून नऊ, भिवंडीतून चार, कल्याणमधून १६, उल्हासनगरमधून सात, तर वागळे इस्टेटमधून एकावर हद्दपारीची कारवाई झाली. कलम ५७ नुसार ठाण्यातून दोन, कल्याणमधून आठ आणि उल्हासनगरमधून तिघांना हद्दपार केले आहे. याच काळात ४७ वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे. यातील ठाण्यातून दोघे, भिवंडीतून एक, कल्याणमधून २९, उल्हासनगरमधून १२, तर वागळे इस्टेट परिमंडळातून तीन वॉन्टेड (पाहिजे असलेले) आरोपींना पकडण्यात आले. तर, १५ फरारी गुन्हेगारांनाही अटक करण्यात आली आहे. यातील ठाणे आणि भिवंडीतून प्रत्येकी एक, कल्याणमधून नऊ तर उल्हासनगरमधून चौघा फरारींना पकडण्यात आले आहे.


याशिवाय, बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्या २६० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ लाख ५८ हजार ८०३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय, कल्याणमधून तीन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे, तलवार, गुप्ती आणि चाकू असा १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही मोहीम यापुढेही अशीच राबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

एका विशेष मोहिमेंतर्गत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोन हजार २७ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गंभीर गुन्ह्णांची नोंद असलेल्या ५१ जणांना हद्दपार केले आहे.
- मधुकर पांडेय,
सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर

Web Title: Prevention of 2027 against Thane Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.