प्राषी फार्मातील औषध उत्पादन थांबविले
By admin | Published: December 21, 2015 01:13 AM2015-12-21T01:13:02+5:302015-12-21T01:13:02+5:30
शिरगाव येथील प्राषी फार्मास्युटीकल लिमिटेड या कंपनीच्या आवारातच औषध जाळल्याने व इटीपी प्लॅटमधून प्रदूषित पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेल्या उग्र वासाने श्वसनाचा त्रास होत
हितेन नाईक, पालघर
शिरगाव येथील प्राषी फार्मास्युटीकल लिमिटेड या कंपनीच्या आवारातच औषध जाळल्याने व इटीपी प्लॅटमधून प्रदूषित पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेल्या उग्र वासाने श्वसनाचा त्रास होत असल्याच्या जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांनी या कंपनीचे उत्पादन थांबविले.
या कंपनीच्या समोरील एका बंगल्यात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर आपल्या कुटुंबासह राहतात. या भागात नेहमीच संध्याकाळपासून ते पहाटेपर्यंत उग्र वासाने नागरिकांना श्वसनाचा त्रास होणे, डोळे चुरचुरणे, पोटात मळमळ होणे इ. तक्रारी करण्यात आल्या होत्या. १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी बांगर यांनी फोन करून उपविभागीय अधिकारी दावभट यांना संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
उपविभागीय अधिकाऱ्याने याप्रकरणी तहसीलदार चंद्रसेन पवार व तारापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांची पाहणी करताना प्राषी फार्मास्युटीकलच्या शेडमधील पश्चिमेकडील भिंतीलगत टेबल कोटींग डक्टरमधून वायूगळती होऊन कंपनीच्या इटीपी (इन्फ्ल्युअंट) ट्रीटमेंट प्लँट)मधून प्रदूषित पाणी जाऊन निर्माण झालेल्या दलदलीमधून उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचत असल्याने कंपनीवर कारवाई करण्याचा अहवाल दोन्ही विभागाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे कंपनी जोपर्यंत टेबल कोटींग डक्टची गळती थांबवत नाही व इटीपी प्लँटमधील दूषित पाण्यावर प्रकिया करून त्याची नियमाप्रमाणे विल्हेवाट लावत नाही. तोपर्यंत या कंपनीमधील उत्पादन बंद करण्याचे आदेश दावभट यांनी दिले. या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंडसंहिता १८६० ची ४५ मधील कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्याची नोटीस बजावली जाणार आहे.