प्रदुषण रोखा: डोंबिवलीच्या सायकल मित्र संमेलनाला १ हजार सायकपटूंची रॅली
By अनिकेत घमंडी | Published: January 9, 2018 04:42 PM2018-01-09T16:42:54+5:302018-01-09T16:46:20+5:30
डोंबिवली: सायकल मित्र संमेलनात १ हजार सायकलपटू डोंबिवली शहराच्या विविध भागातून सायकल चालवत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख पाच - सहा ठिकाणांहून २०० सायकलपटू एकाच वेळी सायकल चालवणार आहेत.
२८ जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली निघणार असून साधारणत: सात-साडेसात वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहानजीक सगळया सायकलप्रेमींचे एकत्रिकरण होणार आहे. त्यानंतर सायकल रॅलीचा समारोप होणार अल्पावधीनंतर न्याहारीचा उपक्रम असेल आणि त्यानंतर तातडीने संमेलनाला सकाळी ८.३० ते ९ वाजता वेळेत शुभारंभ करण्याचा आयोजकांचा मानस आहे. क्रिडा भारती, नॅशनल युथ आॅर्गनायझेशन आणि डोंबिवली सायकल क्बल या शिखर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सायकल मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे आयोजक कमलाकर क्षिरसागर, डॉ. सुनिल पुणतांबेकर आणि अन्य सहकार्यांनी सायकल रॅलीची माहिती दिली. त्या रॅलीत संभाव्या अडचणी अथवा नियोजन कसे करावे लागेल याची रंगित तालीम घेण्यासाठी रविवारी १४ जानेवारी रोजी शहरातील प्रमुख पाच ठिकाणांहून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी फडके रोड गणेश मंदिर, गणेश मंंदिर मिलापनगर,एमआयडीसी, रेतीबंदर चौक-डोंबिवली पश्चिम, अग्नीशमन दल-महात्मा फुले रोड-डोंबिवली पश्चिम, आणि श्री स्वामी समर्थ मठ नांदिवली आदी ठिकाणांहून सकाळी ७ वाजता सायकलपटू सायकल रॅलीची रंगित तालीम करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक ठिकाणाहून संमेलन आयोजकांनी चार स्वयंसेवकांची फळी तयार केली असून ते स्वयंसेवक रॅलीसोबत राहतील. पूर्वेच्या पारसमणी चौकात सगळयांचे एकत्रिकरण होणार असून त्यानंतर शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयासमोर सगळे जातील, तेथे समारोप होईल. सगळयांचे एकत्रिकरण होईल, वेळ किती लागतो,अडचणी काय येऊ शकतात, तसेच अन्य तांत्रिक बाबींवर चर्चा झाल्यावर या रॅलीची सांगता होणार आहे.
त्यानूसार २८ जानेवारी रोजी होणा-या रॅलीचे नियोजन करणे सोपे जाणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. प्रदुषण टाळण्यासाठी सायकल रॅली, सायकल चालवा आरोग्य राखा हा मुख्य उद्देश असून त्या घोषवाक्याखाली ही रॅली निघेल असेही सांगण्यात आले. १४जानेवारी रोजी होणा-या सायकल रॅलीला डोंबिवलीसह परिसरातील सायकलपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहक करण्यात आले आहे. तसेच २८ जानेवारी रोजी वयवर्षे १२ ते पुढील सायकपटूंना प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होता येणार आहे. तर त्या खालील वयोगटातील मुलांना थेट संमेलनस्थळी पालकांसमवेत येऊन त्या रॅलीच्या समारोपाचा आनंद लुटावा, एकत्र यावे, सायकल विषयक माहिती, आकर्षण वाढवावे, जनजागृती करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.