साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:13+5:302021-06-27T04:26:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गूळ हा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने शहरवासीय आता गुळाकडे त्यातही नैसर्गिक गुळाकडे वळू लागली आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गूळ हा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने शहरवासीय आता गुळाकडे त्यातही नैसर्गिक गुळाकडे वळू लागली आहेत. पूर्वी साखर खाणे हे स्टेटस मानले जात होते. परंतु, सकस आणि संतुलित आहाराबाबत जनजागृती झाल्याने तसेच आहार तज्ज्ञही गुळाचे महत्त्व पटवून देत असल्याने आता गूळ जास्त भाव खात आहे. काही घरात चहातून साखर बाद झाली असून त्याची जागा गुळाने घेतली आहे.
गूळ हा ऊस, खजूर आणि कोकोनटपासून बनतो. महाराष्ट्रमध्ये ऊसापासून बनविलेला गूळ जास्त वापरतात. रसायनयुक्त आणि नैसर्गिक म्हणजे सेंद्रिय असे दोन प्रकारांचे गूळ बाजारात येत आहेत. त्यातही उपप्रकार आहे ते म्हणजे साधारण गूळ आणि चिक्कीचा गूळ. चहासाठी, काढ्यासाठी साधारण गुळाचा वापर होतो.
--------------------------------
सेंद्रिय गुळाचे दर
२००५ : २० रु. प्रति किलो
२०१० : २५ ते ३० रु. प्रति किलो
२०१८ : ११० रु. प्रति किलो
२०२१ : १२० ते १२६ रु. प्रति किलो
--------------------------------
साखर गोडवा वाढविते तर गुळामुळे पदार्थ चविष्ट होतो आणि त्या पदार्थाला चांगला रंग येतो. साखर, गूळ आणि मध यांमध्ये कॅलरीज सारख्याच असतात. गूळ शरीरासाठी चांगला म्हणून तो खूप जास्त खाऊ नये. आपल्याकडे उन्हाळ्यात साखर आणि हिवाळा-पावसाळ्यात गुळाचा वापर केला जातो. चयापचय प्रक्रियेसाठी गूळ हा चांगला असतो. गुळाचा रंग जितका गडद तितके त्यात आयर्न अधिक असते. भारतीय महिलांमध्ये आयर्नची कमी असते त्यादृष्टीने गूळ फायदेशीर ठरतो. तसेच, गुळामध्ये पोटॅशियम मिनरल्स असल्याने सुजट शरीरासाठी तसेच ऍस्थमासाठीदेखील गूळ उपयुक्त ठरतो. तो अति खाऊ नये अन्यथा साखरेइतकाच शरीरासाठी घातक ठरतो.
- डॉ. दीपाली आठवले, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ
--------------------------------
गुळाला नक्कीच मागणी वाढली आहे. कोरोनामध्ये ही मागणी अधिक वाढली एक तर लोकांना गुळाचे महत्त्व पटू लागले आणि दुसरे म्हणजे विविध काढ्यासाठी गुळाचा वापर होऊ लागला. २०१५- १६ पासून गुळाच्या खरेदीला शहरात खरेदीला सुरुवात झाली आणि २०२०-२१ मध्ये मागणीत प्रचंड वाढ झाली. सेंद्रिय गुळालाच जास्त मागणी असते. शेतकरीही आता याच प्रकारचा गूळ तयार करण्याला प्राधान्य देत आहेत.
- मोहन तुवर, नैसर्गिक गुळाचे व्यापारी
सध्या जास्त प्रमाणात गूळ खरेदी होत आहे. आम्ही नैसर्गिक गूळच विक्रीला ठेवतो. याच गुळाला मागणी चांगली आहे.
- पूनम मोरे, किराणा विक्रेत्या
--------------------------------
गुळाचा चहा हा शरीरासाठी फायदेशीर आहेत. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही गुळाचा चहा ठेवण्याचा विचार केला. या चहाची मागणी चांगल्या प्रमाणात आहे.
- गजानन आंधळे, हॉटेलमालक
-----------------------------
लहानपणी आम्ही साखरेचा चहा पीत असत. परंतु, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी साखर बंद झाली म्हणून गुळाचा चहा प्यावा लागे. गूळ तसा उष्ण सतत त्यावेळी गुळाचा चहामुळे कान दुखत म्हणून गुळाचा चहा बंद करून साखरेचा चहा सुरू केला. मला मधुमेह किंवा इतर कोणते आजार नाही. त्यामुळे मी आजही साखरेचा चहा पितो. एखाद्या दिवशी गुळाचा चहा पिणे ठीक आहे.
- लक्ष्मण चाफेकर, ९५ वर्षे