सोन्यासारख्या खैराला कवडीमोलाचा भाव
By admin | Published: April 20, 2016 01:51 AM2016-04-20T01:51:08+5:302016-04-20T01:51:08+5:30
पालघर व ठाणे जिल्ह्यातील वन विभागाच्या डेपोवरील लिलावामध्ये सोन्यासारख्या खैराला व सागाला कवडीमोल भाव मिळत असून तो योग्य मिळावा यासाठी व्यापाऱ्यांची रिंग तोडण्याची गरज आहे
आरीफ पटेल, मनोर
पालघर व ठाणे जिल्ह्यातील वन विभागाच्या डेपोवरील लिलावामध्ये सोन्यासारख्या खैराला व सागाला कवडीमोल भाव मिळत असून तो योग्य मिळावा यासाठी व्यापाऱ्यांची रिंग तोडण्याची गरज आहे. गेल्या पंधरा वर्षापासून वन खात्याने ठरविलेले दर रद्द करून ते नव्याने निश्चित करून शासनाचे नुकसान टाळावे अशी मागणी होते आहे.
वन विभागाचे पालघर व ठाणे जिल्ह्यात नेटाळी, शिरसाड, विक्रमगड, भिराड अशा ठिकठिकाणी जंगलातील सिलींगची चोरी, जप्त केलेली चोरटी व आदिवासींच्या मालकीची लाकडे डेपोवर जमा केली जातात. त्यानंतर त्यांचा लिलाव केला जातो. त्यासाठी अनेक व्यापारी डेपोमध्ये येतात त्यावेळी उपवनसंरक्षक, वनक्षेत्रपाल व कर्मचारी उपस्थित राहून लाकडाचे घनमिटर किती, नग व लाकडाची जात या बाबत मोठमोठ्याने माहिती देतात.
त्यानंतर व्यापारी बोली बोलतात परंतु व्यापाऱ्यांनी रिंग केलेली असल्याने या सोन्यासारख्या लाकडांची विक्री मातीमोल दराने होते. वास्तविक वन खात्याने या लाकडाचे दर पंधरा-वीस वर्षापासून ठरविले आहेत. त्यात मोठी वाढ घडविण्याची गरज आहे. परंतु ते होत नाही. त्यामुळे सरकारचा महसूल बुडतो आहे.
रेतीची रॉयल्टी २०० रूपये ब्रासवरून ३५०० रुपये ब्रास झाली. त्याचप्रमाणे या लाकडांचे शासकीय भावही वाढविले गेले जावेत अशी मागणी आहे.