हलव्याच्या दागिन्यांच्या किमतीत दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:37 AM2019-01-11T05:37:29+5:302019-01-11T05:37:49+5:30
शाहीहार, मंगळसूत्र, कर्णफुले, नथ आकर्षण : दागिन्यांना मागणी जास्त मात्र कारागिरांची कमतरता
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीच्या सणाला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे हलव्याच्या दागिन्यांना मागणी जास्त आहे. मात्र, हे दागिने तयार करणारे कारागीर आता उरलेले नाहीत. परिणामी, मागील वर्षांच्या तुलनेत दागिन्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.
मकरसंक्रांतीला सून, जावई आणि लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते. सुनेसाठी सौभाग्यसेट, वाकीजोड (बाजूबंद), बांगडीजोड, पाटलीजोड, शाहीहार, कमरपट्टा, अंगठी, मंगळसूत्र (एकेरी), मंगळसूत्र (दुहेरी), मेखला, कर्णफुले (भोकर), मोठा मुकुट, बिंदी, एकपदरी हार, दोनपदरी हार, चापाची नथ (मोठी), चापाची नथ (लहान) इत्यादी दागिने उपलब्ध आहेत. जावयांसाठी एकपदरी हार, दोनपदरी हार, सजवलेला हत्ती, नारळ, गुलाब परडी, घड्याळ, मोबाइल इत्यादी वस्तू हलव्याच्या दागिन्यांमध्ये उपलब्ध आहेत.
महिलांचे दागिने ८० रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. पुरुषांचे दागिने २०० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. लहान मुलांसाठीचे दागिने १०० ते ४५० रुपयांच्या घरात आहेत. हलव्याच्या दागिन्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. परंतु, त्यासाठी कारागीर पूर्वीसारखे उरले नाहीत. जुन्या पिढीतील काही महिला हे दागिने तयार करत असल्याने ते बाजारात उपलब्ध होत आहेत. यंदाच्या वर्षी या दागिन्यांच्या किमती दुपटीने वाढल्या असल्याचे दागिनेविक्रेते श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले.
लहान मुलींसाठी स्पेशल तारासेट
लहान मुलांसाठी रंगीत वाडीसेट, सोनेरी वाडीसेट आणि लॉकेट, तर मुलींसाठी स्पेशल तारासेट उपलब्ध आहे. त्यात कमरपट्टा, हेअरबॅण्ड मुकुट, वाकी, बांगडीजोड, लॉकेट, पैंजण इत्यादी वस्तू बाजारात आल्या असून, त्या आकर्षण ठरत आहेत.