डाळींचे भाव उतरले, तर कडधान्ये महागल्याने ग्राहकांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:25 AM2020-12-14T00:25:05+5:302020-12-14T00:27:10+5:30
शेवग्याच्या शेंगा अद्याप महाग; सीताफळही कडाडले
ठाणे : काही दिवसांपासून महागलेल्या डाळी या आठवड्यात स्वस्त झाल्या आहेत. दुसरीकडे कडधान्य मात्र महागले आहे. भाज्या स्वस्त असल्या, तरी शेवग्याच्या शेंगा अद्याप महाग आहेत. मुळा ही आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. फळांमध्ये सीताफळ महाग झाले असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
गेल्या आठवड्यात सुक्या खोबऱ्यानंतर आता कडधान्य महागले आहे. तूरडाळ, मूगडाळही महाग होती. आता या डाळी स्वस्त झाल्या असून, दहा रुपयांनी दर उतरले असल्याचे किराणा विक्रेते कुणाल सराफ यांनी सांगितले. कडधान्यापेक्षा डाळींची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. त्यामुळे डाळी स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सफरचंद स्वस्त झाले आहेत. आता सीताफळ महाग झाले आहे. हिरव्या द्राक्षांचा सीझन सुरू झाला नसला, तरी काळी द्राक्षे बाजारात आली आहेत. मात्र, ती महाग असल्याचे फळविक्रेते दीपेश मोरे यांनी सांगितले. पेरू आणि संत्रीही सध्या स्वस्त तर माल्टा महाग आहे. भेंडी आता स्वस्त झाली आहे. पालेभाज्या प्रचंड स्वस्त असल्याचे भाजी विक्रेते मोरे म्हणाले.
तूरडाळ ११० रुपये किलाे
तूरडाळ आधी १३५ रुपये किलोने तर मूगडाळ १३० रुपये किलोने मिळत होती. या आठवड्यात तूरडाळ होलसेलमध्ये ११० रुपयांनी तर किरकोळमध्ये १२५ रुपये किलो, मूगडाळ होलसेलमध्ये ११५ तर किरकोळमध्ये १२० रुपये किलोने मिळत आहे.
काळी द्राक्षे २०० रु. किलाे
सफरचंद होलसेलमध्ये १४० ते १६० तर किरकोळमध्ये १६० ते १८० रुपये किलोने मिळत आहेत. आधी २०० ते २२० रुपये किलोने मिळत होते. काळी द्राक्षे होलसेलमध्ये १६० रुपये किलो तर किरकोळमध्ये २०० रुपये किलोने मिळत आहे.
भेंडी ५० रु.कि.
भेंडी होलसेलमध्ये ३० ते ४० तर किरकोळमध्ये ४० ते ५० रुपये किलो, टोमॅटो होलसेलमध्ये ३० ते ४० तर किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये किलोने मिळत आहे. होलसेलमध्ये मुळा एका जुडीत १५ ते २० असून ती २० रुपयांनी मिळते. किरकोळमध्ये २० रुपयांत एका जुडीत तीन नग मिळतात.
लॉकडाऊनमध्ये गगनाला भिडलेले भाजीचे भाव आता कमी झालेले दिसून येत आहेत. थंडीची चाहूल लागल्यावर बाजारात सर्वप्रकारच्या भाज्या मुबलक मिळू लागल्या आहेत. तसेच, ताज्या भाज्या या थंडीमध्ये अधिक चविष्ट लागत आहेत.
- मेघा साेपारकर, ग्राहक
संत्री स्वस्त झाली असली, तरी माल्टा अद्याप महाग आहे. माल्टा कधी उपलब्ध होतो, तर कधी नाही, अशी परिस्थिती आहे.
- दीपेश माेरे, फळविक्रेता
डाळींची आवक वाढल्याने डाळींचे भाव कमी झाले आहेत. कडधान्याचा मोजकाच माल भरला जात आहे.
- कुणाल सराफ, किराणा दुकानदार