श्रावण महोत्सव २०१८ पाककला स्पर्धेची प्राथमिक फेरी डोंबिवलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:39 AM2018-08-13T03:39:18+5:302018-08-13T03:39:38+5:30
दोन वर्षापासून मिती क्रिएशन्सच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरावर विविध दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
ठाणे : दोन वर्षापासून मिती क्रिएशन्सच्या वतीने आयोजित श्रावण महोत्सव या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरावर विविध दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी डोंबिवलीत गुरूवार १६ आॅगस्ट रोजी आयोजिण्यात आली आहे. लोकमत सखीमंच याचे माध्यम प्रायोजक आहे.
मातोश्री महिला प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आदित्य मंगल कार्यालय, डोंबिवली स्टेशन पूर्व येथे १६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ही प्राथमिक फेरी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. तुषार प्रीती देशमुख (शेफ) आणि उत्तरा मोने हे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
पाच विजेत्या महिलांना विविध स्वरुपाची आर्कषक बक्षीसे मिळणार आहेत. स्पर्धकांव्यतिरिक्त तर यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांसाठीसुध्दा लकी ड्रॉ स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यातूनही अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. लोकमत सखीमंचच्या सदस्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धेची अंतिम फेरी ८ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईतील कोकणेज कोहीनूर या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या किचनमध्ये होणार आहे. तर या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा ९ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्टÑीय स्मारक, दादर येथे दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे. विजेत्या किचन क्वीनला केसरीची माय फेअर लेडी ही टूरदेखील मिळणार आहे. त्यामुळेच या स्पर्धेची किचन क्वीन कोण होणार हे महाअंतिम सोहळ्यातच जाहीर होणार आहे. डोंबिवली येथील प्राथमिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कविता गावंड यांच्याशी ९८१९९६३३४८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक उत्तरा मोने यांनी केले आहे. जास्तीत जास्त महिलांनी ह्या स्पर्धेत भाग घ्यावा व उपस्थित रहावे असे आवाहन लोकमत सखीमंच आणि मिती क्रिएशन्सतर्फे करण्यात आले आहे.
‘मक्यापासून बनवलेला एक पदार्थ’ असा या स्पर्धेचा विषय असणार आहे. त्यानुसार हा पदार्थ महिलांनी घरीच बनवून आणायचा आहे. विविध विभागातून झालेल्या प्राथमिक फेरीत प्रत्येक शहरातून ५ महिलांची निवड होणार आहे.