पंतप्रधान, मुख्यमंत्री, पवार ठाण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 05:37 AM2018-12-12T05:37:46+5:302018-12-12T05:39:16+5:30
मेट्रो ५ चे भूमिपूजन; पुढील आठवड्यात विविध कार्यक्रम
- सुरेश लोखंडे
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाणे - कल्याण - भिवंडी मेंट्रो- ५ च्या भूमिपूजनासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर १८ डिसेंबर रोजी येत आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार २२ डिसेंबरला शहापूर येथे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील भिवंडीला ३१ डिसेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई मेट्रो ४च्या नंतर आता ठाणे-कल्याण आणि भिवंडी या मेट्रो ५च्या भूमिपूजनाचा मुहूर्त एमएमआरडीएद्वारे निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या हस्ते मंगळवारी होणाºया या कार्यक्रमाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे ठिकाण निश्चित करण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सोइस्कर ठरणारे कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असून, जिल्हा प्रशासनही प्रयत्न करीत आहे.
ठाणे-कल्याण- भिवंडी हा मेट्रो प्रकल्प सुमारे २५ ते ३० किलोमीटरचा आहे. एमएमआरडीएद्वारे होत असलेल्या या मेट्रोचे कल्याण एपीएमसी मार्केट येथील नंबर एकचे स्टेशन असून, त्यानंतर कल्याण मेट्रो स्टेशन, सहाजानंद चौक, दुर्गाडी फोर्ट, आधारवाडी, गोवेगाव एमआयडीसी, राजनोली, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, कोलशेत आणि कशेळी, बाळकूम नाका आणि कापूरबावडी आदी आदी मुख्य १७ स्टेशन आहेत. या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते निश्चित झाले. त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, संबंधितांमध्ये त्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
लग्नाचा मुहूर्त दोन वर्षे लांबणीवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शहापूर येथे एका लग्न समारंभासाठी येत आहेत. २२ डिसेंबर रोजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे चिरंजीव निखील बरोरा यांचा लग्न समारंभ आहे. निखील हे ठाणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आहे. त्यांच्या लग्नाचा मुहूर्त पवार यांनी तारीख दिल्यानंतरच काढण्यात आला. त्यासाठी सुमारे दोन वर्षे त्यांनी प्रतीक्षा केली. त्यानंतर, पवार यांच्या मिळालेल्या तारखेस अनुसरून या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. याशिवाय खासदार कपील पाटील यांच्या चिरंजीवांच्या लग्नास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३१ डिसेंबरला उपस्थित राहणार आहेत.