श्रीराम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By धीरज परब | Published: December 10, 2023 07:00 PM2023-12-10T19:00:25+5:302023-12-10T19:01:02+5:30
मीरारोड ते अयोध्या राम जन्मभूमी पर्यंतच्या श्रीराम भक्तांच्या पदयात्रेला सुरवात
मीरारोड - अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारून करोडो श्रीराम भक्तांचे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. आज मीरा भाईंदर मधून ३०० रामभक्त हे अयोध्येला पायी चालत जाणार आहेत. संपूर्ण देशात 'जय श्रीराम'चे वातावरण बनले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. काशीमीरा महामार्गावर रामभक्तांच्या पदयात्रेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री यांनी श्रीरामाच्या पालखीला खांदा दिला.
मीरा भाईंदर मधून ३०० रामभक्त सुमारे ४५ दिवसांचा पायी प्रवास करून २२ जानेवारीपर्यंत अयोध्येत दाखल होतील. अयोध्येत नव्या मंदिरातील श्रीरामाचे दर्शन घेऊन हे पदयात्री परतणार आहेत. भक्तांना पदयात्रेत लागणारे सर्व साहित्य व आवश्यक सामग्री ही आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशनची रुग्णवाहिका या भक्तांच्या पदयात्रेत सतत सेवेत राहणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की , आमदार प्रताप सरनाईक यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आठवण सांगितली. दिघे साहेबांनी १९८७ मध्ये चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. तेव्हा आम्ही एकत्र होतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबाना माहीत होते की एक दिवस अयोध्येत राम मंदिर बनणार आणि करोडो लोकांचे स्वप्न साकार होईल. अयोध्येत श्रीराम मंदिर बनणार नाही असे अनेकांना वाटत होते व विरोधक मंदिर कधी होणार असा प्रश्न करायचे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिर पण बनवले आणि त्याच्या उदघाटनाची तारीखही जाहीर केली आहे , त्यामुळे विरोधकांचे तोंड बंद झाले आहे.
२२ जानेवारीला सर्व देशातून लोक अयोध्येत येणार आहेत. पण ४५ दिवस चालणे ही साधारण गोष्ट नाही. तुम्हा ३०० पदयात्रींना श्री राम आणि हनुमान ताकद देईल. तुमचे स्वागत ठिकठिकाणी होईल. तुम्हाला प्रेरणा, उत्साह व जोश मिळत राहील. श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या मी अयोध्येत स्वतः भेटेन असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पदयात्रींना दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी 'जय श्री राम' चा जयघोष करून भक्तांचा उत्साह वाढवला.
पदयात्रे साठी ३०० भक्तांना सहकार्य करून प्रोत्साहन दिल्या बद्दल आ. सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले . हर घर मोदी प्रमाणे आता मन मन मोदी वातावरण देशात आहे. उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येचा विकास करून पूर्ण नकाशा बदलला आहे. 'बुलडोजर बरोबर चलाते है वो' असे सांगत योगी यांच्या कामाचे मुख्यमंत्री यांनी कौतुक केले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, शिवसेना जिल्हा प्रमुख राजू भोईर व महिला संघटक निशा नार्वेकर, उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रम प्रताप सिंह, माजी नगरसेविका वंदना पाटील, पूजा आमगावकर, महेश शिंदे, विकास पाटील आदी उपस्थित होते.
आमदार सरनाईक यांनी जागवल्या आनंद दिघे यांच्या आठवणी....
अयोध्येत आज प्रभू श्री रामाचे मंदिर उभे राहिले आहे ही तमाम हिंदू आणि श्री राम भक्तांसाठी आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण राम मंदिर आंदोलन सुरु होण्यापूर्वीच सर्वात पहिली चांदीची विट देणारे 'ठाणे' शहर होते. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून ही १९८७ साली पहिली चांदीची विट ठाणे शहरातून अयोध्येला रवाना करण्यात आली होती. त्याकाळी शिवसेना राम मंदिराच्या निर्माणासाठी फारच अग्रेसर भूमिकेत होती.
या सगळ्या घटनेचे एकनाथ शिंदे हे तेव्हा साक्षीदार होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी श्री राममंदिर निर्माणासाठी उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे कुणाच्याही ध्यानीमनी नसताना किंबहुना, बाबरी मशिद पाडण्याच्या पाच वर्षे आधीच १९८७ साली आनंद दिघे साहेब यांनी, अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी पहिली चांदीची विट बनवून घेतली होती. त्या विटेवर देखील 'जय श्रीराम' असे लिहिण्यात आले होते हे तमाम ठाणेकरच नाही तर महाराष्ट्रातील राम भक्तांच्या लक्षात आहे , असे आमदार सरनाईक यांनी सांगत त्यावेळच्या आठवणी जागवल्या.