बनावट मद्यनिर्मिती अड्ड्यावर छापा; उत्पादन शुल्कची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:04 AM2019-07-25T01:04:49+5:302019-07-25T01:04:54+5:30
१२ लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडीतील कुंदाफाटा आणि वाडा येथील पालसई येथे छापा टाकून बनावट विदेशी मद्यासह १२ लाख दहा हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी हस्तगत केला. याप्रकरणी राजेश ठाकूर याच्यासह दोघांना अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, कोकण विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण आणि अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुधीर पोकळे, दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील आणि अनिल राठोड आदींच्या पथकाने खासगी वाहनाने भिवंडी तालुक्यातील कुंदाफाटा येथील पत्राशेड, नदी जवळ नबावट मद्य निर्मिती केंद्रावर २३ जुलै रोजी छापा टाकला. यावेळी राजेश ठाकूर हा बनावट मद्य आणि मद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या, बुचे आणि लेबल्स अशा सहा लाख ४७ हजार ४८० रुपयांच्या मुद्देमालासह तिथे आढळून आला.
या कारवाईमध्ये आरोपी राजेश ठाकूर याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या चौकशीतून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते कॉलेजजवळ पालसई येथील एका घरातून कुणाल काशिद यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून बनावट विदेशी मद्याचे पाच बॉक्स असलेल्या कारसह पाच लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईनंतर काशीद यालाही अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कुंदाफाटा येथे बनावट मद्यनिर्मिती करण्यात येत असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्या आधारे दोन कारवाया करून सुमारे १२ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.