ठाणे कारागृहात कैद्यावर कैचीहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:31 AM2018-11-29T06:31:19+5:302018-11-29T06:31:33+5:30
डोळा थोडक्यात बचावला : जखम खोल असल्याने १२ टाके
ठाणे : बंगाली भाषेत शिवी दिल्याचा जाब विचारल्याने जाफर अफताब हुसेन खान याच्यावर मेजाबुद्दीन याकूब खान या कैद्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैचीने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात जाफर जखमी झाला आहे. त्याचा डोळा थोडक्यात बचावला आहे. दरम्यान, जखमी जाफरला १२ टाके पडले आहेत. हल्लेखोर मेजाबुद्दीन याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मालवणी पोलीस ठाण्यात जाफर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला १० फेब्रुवारी २०१८ रोजी तळोजा येथून ठाणे कारागृहात आणण्यात आले. दरम्यान, त्याच्या विनंतीनुसार कारागृह प्रशासनाने त्याला कपडे शिवण्याचे काम दिले आहे. तो कारागृहाच्या कारखान्यामध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कपडे शिवण्यास शिकवतो. मंगळवारी तो मेजाबुद्दीन व इतर कैद्यांसह नेहमीप्रमाणे कारखान्यात पोहोचला. सकाळी ११ वाजता जेवण झाल्यानंतर पुन्हा काम सुरू केले. दुपारी १.१५ च्या सुमारास तो गाणे गुणगुणत होता. तो शिव्या देत असल्याचे वाटल्याने मेजाबुद्दीन याने त्याला जाब विचारला. त्यानंतर, मेजाबुद्दीन याने बंगालीत जाफरला शिवीगाळ केली. त्यावरून झालेल्या वादात मेजाबुद्दीनने तेथील कैचीने जाफरच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूस हल्ला केला.
जाफरला इतर कैदी व शिपाई विजय मांडवकर यांनी दवाखान्यात नेले. जाफरला १२ टाके घालण्यात आल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.
शिवी दिल्यावरून वाद
दुपारी १.१५ च्या सुमारास जाफर गाणे म्हणत होता. तेव्हा, मेजाबुद्दीन याला तो शिव्या देत असल्याचे वाटल्याने त्याने जाब विचारला. त्यावर जाफरने शिवी दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर, मेजाबुद्दीन याने बंगाली भाषेमध्ये जाफरला शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन मेजाबुद्दीनने तेथील कैचीने जाफरच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूस हल्ला केला.