पॅरोलवर घरी परतलेला कैदी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:54 PM2020-06-02T23:54:21+5:302020-06-02T23:54:32+5:30
रुग्णाला लक्षणे नाहीत : पहिली पॉझिटिव्ह रुग्ण बरी होऊन परतली घरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : ठाणे येथील कारागृहातून पॅरोलवर सुटून जव्हारला आलेला मूळचा ऐना बरफपाडा येथील ३० वर्षीय कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्याला पालघर येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील पहिली महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाली असून तिला घरी सोडण्यात आले आहे. ती सध्या भिवंडी येथील तिच्या घरी होम क्वारंटाइन आहे.
जव्हार तालुक्यातील हा दुसरा रुग्ण आहे. तो ठाणे कारागृहात कैदी असून त्याला २८ मे रोजी पॅरोलवर सोडण्यात आले. ठाण्याहून थेट जव्हार तालुक्यातील मूळ गावी न जाता तो धानोशी डोहरेपाडा येथील त्याच्या मित्राला भेटला. त्याला दुचाकीवरून तो फरळेपाडा येथे त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी गेला. तेथे तो दोन ते तीन तास थांबला.
दरम्यान, गावकऱ्यांनी त्याला विरोध करीत तेथून परत जाण्यास भाग पाडले. त्यामुळे तो तेथून पायी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात गेला. नंतर त्याला शासकीय विलगीकरण कक्षात दाखल करून त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल मंगळवारी सकाळी मिळाला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून डोहरेपाडा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या रुग्णाला कोरोनाची कुठलीच लक्षणे नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.