घरचे जेवण न दिल्याने कैद्याने घेतला पोलिसाच्या हाताचा चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 04:29 AM2020-03-01T04:29:46+5:302020-03-01T04:29:54+5:30
न्यायबंदी कैद्याने ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई महेश ठाकूर याच्या हाताचा चावा घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात घडली.
ठाणे : न्यायालयात आणलेले घरचे जेवण न दिल्याचा राग मनात धरून मोहम्मद सोहल शौकतअली मन्सुरी (२६ रा. नळबाजार, मुंबई) या न्यायबंदी कैद्याने ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई महेश ठाकूर याच्या हाताचा चावा घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात घडली. तसेच ठाकूर यांच्यासह पोलीस शिपाई विवेक काळे यांना त्याने शिवीगाळ करून धक्काबुकी केली.
हा प्रकार दिंडोशी न्यायालयातून पुन्हा: ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेताना नौपाडा परिसरात घडला. या प्रकरणी मन्सुरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कदम यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांची शुक्रवारी ठाणे मध्यवर्ती कारागृह ते दिंडोशी न्यायालय अशी ड्युटी होती. ते १२ कर्मचाऱ्यांसह गाडीने ठाणे कारागृहातून १२ कैद्यांना घेऊन दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दिडोंशी न्यायालयात हजर केले.
हजर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व न्यायबंदी व पोलीस कैदी पार्टी असे १४ जण या गाडीमध्ये बसून कारागृहात निघाले. न्यायबंदी मोहम्मद मन्सुरी याची महिला नातेवाईक जेवणाचा डब्बा घेवून आली होती. तिने डबा मन्सुरीला देण्यास सांगितले. मात्र, त्याला घरचे जेवण देवू शकत नाही, असे पोलिसानी सांगितल्यावर त्याचा राग येऊन मन्सुरी याने कदम यांच्याशी हुज्जत घातली.
>शिवीगाळ करून धक्काबुकी
गाडी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे येताना हरीनिवास सर्कल ते तीन पेट्रोलपंपच्या दरम्यान मन्सुरी याने पोलीस शिपाई ठाकूर आणि काळे यांना शिवीगाळ करून धक्काबुकी केली. तसेच ठाकूर यांच्या उजव्या हाताच्या करंगळी जवळ चावा घेऊन त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मन्सुरी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.