चांगल्या गुणांची जोपासणा होण्यासाठी कैद्यांना मिळणार पुस्तकांची मदत
By जितेंद्र कालेकर | Published: March 22, 2024 06:01 PM2024-03-22T18:01:36+5:302024-03-22T18:01:57+5:30
ठाणे कारागृहात बंद्यांसाठी सुरु झाले ई - ग्रंथालय
ठाणे: पुस्तके ही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम हाेताे. मन:स्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात. पुस्तकांमुळे जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. यातून व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो. याच हेतूने कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी, चांगल्या गुणांची जोपासणा होण्यासाठी पुस्तकांची मदत होईल, असे मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई - ग्रंथालय सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी देसाई बोलत होते. कैद्यांनी या ई ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मकदृष्टया आपल्यात परिवर्तन घडवून येण्यासाठी उपयोग करावा. ई-ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कारागृहातील बंद्यांना पारंपारीक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू आदी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची पाच हजारांपर्यंत पुस्तके उपलब्ध आहेत. परंतू, काळानुरुप भौतिक साधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ई-ग्रंथालय झाली आहेत. ई- ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानाचा बंद्यांनाही लाभ होऊन अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा. या हेतूने कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना ई- ग्रंथालयाच्या माध्यमातून पीडीएफ स्वरुपातील पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमासाठी उपअधीक्षक डी. डाबेराव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी के. भवर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, सत्संग फाउंडेशनचे समन्वयक प्राची जोशी तसेच इतर अधिकारी कर्मचारी आणि बंदी उपस्थित होते. ई -ग्रंथालयात संगणकाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरुपात मराठी हिंदी, इंग्रजी या भाषेतील ९५० ई पुस्तके उपलब्ध केलेली आहे. मागणीनुसार ई- पुस्तके बंद्यांना उपलब्ध केली जाणार असल्याचे अधीक्षक भोसले यांनी यावेळी सांगितले.