कारागृहाला सव्वा कोटी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:30 AM2017-07-21T03:30:00+5:302017-07-21T03:30:00+5:30

ठाणे मध्यवर्ती कारागृहात केवळ ६० बंदींनी वर्षभरात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग यासारख्या विविध कामांतून तब्बल एक कोटीहून अधिक उत्पन्न

Prisons earn up to three million earnings | कारागृहाला सव्वा कोटी उत्पन्न

कारागृहाला सव्वा कोटी उत्पन्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहात केवळ ६० बंदींनी वर्षभरात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग यासारख्या विविध कामांतून तब्बल एक कोटीहून अधिक उत्पन्न मिळवून किमया घडवली आहे. गतवर्षीपेक्षा हे उत्पन्न अधिक आहे. यंदा सुतारकाम आणि त्यानंतर बेकरी-फरसाणमधून सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे.
बंदींच्या हाताला काम देऊन त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ठाणे मध्यवर्ती विभागात कारखाना विभाग सुरू आहे. यात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण आदी कामे सुरू असतात. बेड्स, डायनिंग टेबल, देव्हारे, कपडे शिवणे, ओट्स, बिस्किट्स, फरसाण, कापड बनवणे यासारख्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ या कारखाना विभागात बंदी बनवत असतात. २०१६-१७ या आर्थिक वर्षात केवळ ६० बंदींनी मिळून १ कोटी ३३ लाख, ६० हजार ३४२ इतके उत्पन्न मिळवून दिले. गतवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा १ कोटी २५ लाख ८ हजार ९४२ इतका होता. यंदा त्यात ८ लाख, ५१ हजार ४०० ने वाढ झाली आहे. सुतारकामातून ४६ लाख २४ हजार १८, शिवणकामातून ३१ लाख ५३ हजार १०५, धोबीकामातून १ लाख ९२ हजार ४५५, यंत्रमागातून १९ लाख तीन हजार १९७, बेकरी-फरसाणमधून ३४ लाख ८७ हजार ५६७ इतके यंदा उत्पन्न मिळाले आहे. सुतारकाम आणि बेकरी-फरसाणमधून जास्त उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न डिसेंबर २०१६ मध्ये मिळाले आहे. कारखाना विभागातून दरवर्षी सुतारकामातून तयार केलेल्या वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना जास्त मागणी असल्याने या दोन विभागांतून कारागृहाला जास्त उत्पन्न मिळते. बंदींनी तयार केलेल्या हाय बॅग आॅफिशियल चेअरला शासकीय अधिकाऱ्यांची अधिक पसंती आहे.

कारागृहाच्या बाहेर शोरूममध्ये या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. गतवर्षीपेक्षा शिवणकाम आणि यंत्रमागातील उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. बंदी या कामात तरबेज झाले, तर शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यावर काम मिळवताना त्यांना कोणती अडचण येणार नाही. त्यामुळे बंदी खूप मन लावून काम करतात, असे कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Prisons earn up to three million earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.