ठाण्यात खासगी बसना दणका

By Admin | Published: March 19, 2016 12:45 AM2016-03-19T00:45:03+5:302016-03-19T00:45:03+5:30

ठाण्यात राजकीय नेत्यांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या आशीर्वादाने बेकायदा सुरू असलेल्या खासगी बसच्या क्लीनरने प्रवाशाला बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या मुजोरीविषयी

Private bus station in Thane | ठाण्यात खासगी बसना दणका

ठाण्यात खासगी बसना दणका

googlenewsNext

ठाणे : ठाण्यात राजकीय नेत्यांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या आशीर्वादाने बेकायदा सुरू असलेल्या खासगी बसच्या क्लीनरने प्रवाशाला बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या मुजोरीविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जाग्या झालेल्या वाहतूक पोलिसांनी या खासगी बसच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.
शुक्रवारी या बसवर कारवाईचा बडगा उगारून दिवसभरात तब्बल ५४ बसवर कारवाई केली. यामुळे गाळण उडालेल्या चालकांनी पुढील कारवाईच्या भीतीने इतर बस रस्त्यावर उतरवल्या नाहीत. या कारवाईमुळे घोडबंदर मार्गावरील परिवहन सेवा, एसटीच्या बस मात्र दिवसभर गच्च भरून धावत होत्या. तसेच एरव्ही शहरातील प्रमुख नाक्यांवर रोज जागोजागी निर्माण होणारे अडथळे मात्र खासगी बस बंद ठेवल्यामुळे निर्माण न झाल्याने शहरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
ठाण्याचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी शहरात बेकायदा सुरू असलेली खासगी बसची वाहतूक बंद केली होती. पण त्यांची बदली होताच हे वाहतुकदार मोकाट सुटले. ठाणे आरटीओने या बस पुन्हा रस्त्यावर दिसल्या तर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण तोही फोल ठरला. अशाच एका बेकायदा बसमधून प्रवास करणाऱ्या शुक्र ाम तायडे या प्रवाशाला झालेल्या मारहाणीमुळे आरटीओ, पोलिसांचे बिंग फुटले. त्यांच्यावर टीकेची झोड उठताच पुन्हा कारवाई सुरू झाली. मात्र अनेक राजकीय नेत्यांच्याच मालकीच्या या बस असल्याने कारवाई किती काळ सुरू राहते, यावर सर्वांचे लक्ष आहे.

आरटीओ करणार परमिट रद्द करण्याची शिफारस
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत
१ मार्च ते आतापर्यंत १८ बसवर कारवाई करून त्यातील ६ बस जप्त केल्या आहेत. शिवाय, त्यांच्याकडून ३ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
यापुढेही जाऊन या बसचालकांकडून तिसऱ्यांदा अशी चूक झाली तर त्यांचे परमिट रद्द करण्याची शिफारस प्राधिकरणाकडे केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परिवहन सेवांना लॉटरी
वाहतूक पोलिसांनी खासगी बसवर केलेल्या कारवाईमुळे घोडबंदर मार्गावर धावणाऱ्या ठाणे परिवहन सेवा, बेस्ट, वसई-विरार महापालिका, मीरा-भार्इंदर महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि एसटीच्या बस गच्च भरून धावत होत्या. शिवाय, शेअर रिक्षाचालकांचीही या कारवाईमुळे चांदी झाली होती. ठाणे परिवहन सेवेने नॉन-पिक-अवरच्या वेळेत ठाणे स्टेशनवर दुसऱ्या मार्गावरील बस घोडबंदर मार्गावर वळवल्या होत्या.

नाकाबंदीसाठी पोलीस तैनात
ठाणे ते घोडबंदर या मार्गावर खासगी बसची नाकेबंदी करण्यासाठी सकाळपासूनच वाहतूक पोलिसांनी पथके तैनात केली होती. या पथकांनी सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल ५४ बसवर कारवाई केली. यामुळे खासगी बसमालक धास्तावल्याने त्यांनी आपली ही सेवा बंद ठेवल्याचे चित्र शुक्र वारी दिसून आले.

Web Title: Private bus station in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.