खासगी बसचे चोरी चोरी चुपके...
By admin | Published: May 11, 2017 01:59 AM2017-05-11T01:59:50+5:302017-05-11T01:59:50+5:30
कोपरी ते घोडबंदर मार्गावर बेकायदा बसच्या विरोधात येथील रहिवाशांनी एल्गार पुकारल्यानंतर त्या काही दिवस बंद होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोपरी ते घोडबंदर मार्गावर बेकायदा बसच्या विरोधात येथील रहिवाशांनी एल्गार पुकारल्यानंतर त्या काही दिवस बंद होत्या. परंतु, आता त्या पुन्हा एकदा सुरू झाल्या असून त्यांनी आता आपला शेवटचा थांबा बदलला आहे. या बस आता कोपरी पूर्वेला जात नसून त्या तीनहातनाक्यावरून चोरी चोरी चुपके चुपके प्रवास करून गावदेवीजवळ येऊन थांबत आहेत. त्यामुळे या भागात चक्काजाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील कित्येक वर्षांपासून ठाणे ते कोपरी अशी बेकायदा प्रायव्हेट बसची सेवा सुरू आहे. या बसवर कित्येक वेळा कारवाई झाली. परंतु, पुन्हा त्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू झाल्या आहेत. परंतु, त्यांचा त्रास कोपरीकरांना होऊ लागल्याने सुरुवातीला त्या बंद करण्यासाठी येथील रहिवाशांनी पत्रव्यवहार केला होता. परंतु, तरीदेखील त्या बंद न झाल्याने अखेर रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अखेर, त्या बंद झाल्या. त्यानुसार, मागील सुमारे दीड महिना त्या बंद होत्या. त्यानंतर, तीनहातनाका ते घोडबंदर असा छुपा मार्ग त्यांनी सुरू केला होता. परंतु, आपल्यावर काही कारवाई होत नाही, हे समजताच या बसवाल्यांची मजल वाढली असून त्यांनी आता पूर्वेकडून आपला मोर्चा पश्चिमेकडे म्हणजेच अतिशय वर्दळ असलेल्या गोखले रोड, गावदेवी भागात वळवला आहे.
कारवाई होऊ नये, या भीतीने या बस आता तीनहातनाक्यावरून हरिनिवासमार्गे गजानन वडापाववाल्याच्या येथून थेट राममारुती रोड येथून गावदेवीपर्यंत धावू लागल्या आहेत. येथून हाकेच्या अंतरावर स्टेशन असल्याने प्रवासीदेखील पुन्हा या बसने प्रवास करताना दिसत आहेत.