कोरोनाविरोधातील लढाईत खासगी डॉक्टरांना विमाकवच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 10:26 AM2020-10-19T10:26:45+5:302020-10-19T10:27:18+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांच्या विम्याचे कवच मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, डॉक्टरांच्या कुटुंबाला ५० लाखांपर्यंत विमा देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र, राज्य सरकार या डॉक्टरांना विमा नाकारत असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन व खासगी डॉक्टर्स संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
ठाणे : कोरोनाविरोधातील लढाईत सरकारी डॉक्टरांच्या बरोबरीने खासगी डॉक्टर कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावताना अनेक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांच्या विम्याचे कवच मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, डॉक्टरांच्या कुटुंबाला ५० लाखांपर्यंत विमा देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र, राज्य सरकार या डॉक्टरांना विमा नाकारत असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन व खासगी डॉक्टर्स संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘आयएमए’च्या अनेक डॉक्टरांनी पुढाकार घेऊन उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र, विमा तरतुदीत इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांचा उल्लेख नसल्याचे असोसिएशनने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने सर्व खासगी डॉक्टरांना ही विमा योजना लागू असल्याचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांना पाठवले. मात्र, प्रत्यक्षात अर्ज केल्यानंतर कोरोना रुग्णालयात सेवा न दिल्याचे कारण देत ते फेटाळले. कोरोनामुळे मृत्यू झालेले आयएमएचे सदस्य डॉक्टर कोरोनाकाळात रुग्णसेवा देत होते का, याची खात्री करून तसे मान्यतापत्र या विम्याच्या अर्जात जोडले होते.
पाच ते सहा महिन्यांपासून खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत. ही सेवा बजावत असताना अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ न त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यात मृत डॉक्टरांचे विम्यासाठी अर्ज केले असता त्यांनी शासकीय रुग्णालयात सेवा बजावली नसल्याचे कारण देत विमा सुरक्षा नाकारण्यात येत आहे. हे चुकीचे असून सर्वच क्षेत्रांतील डॉक्टरांना विमा संरक्षण देणे गरजेचे आहे.
- डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे