खाजगी डॉक्टरचा ५० लाखांचा विमा प्रस्ताव नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:27 AM2020-10-07T00:27:48+5:302020-10-07T00:27:54+5:30
रुग्णांवर उपचार करताना झाला मृत्यू; पालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा न दिल्याची सबब केली पुढे
कल्याण : कोरोनाकाळात आरोग्य सेवा देताना खाजगी व्यावसायिक डॉ. पंकजकुमार चौधरी यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची विमा रक्कम मिळावी, असा प्रस्ताव केडीएमसीने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे पाठविला होता. मात्र, चौधरी यांनी मनपाने तयार केलेल्या कोविड रुग्णालयात सेवा दिली नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्यांचा प्रस्ताव नामंजूर केला आहे.
कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना ५० लाखांचे विमाकवच दिले जाईल. त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढावल्यास डॉक्टरांच्या वारसांना पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये विम्याचा दावा करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दुसरीकडे सुरुवातीला कोरोनाचा कहर वाढत असताना खाजगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देणे थांबविले होते. तर, काहींनी त्यांचे दवाखाने बंद केले होते. त्या वेळी खाजगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा द्यावी, असे आदेश केडीएमसी आयुक्तांनी काढले होते. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले. त्याच काळात डॉ. चौधरी हे खाजगी रुग्णालयात सेवा देत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे विम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मात्र, त्यांनी मनपाने उभारलेल्या कोविड रुग्णालयात सेवा न दिल्याने त्यांचा विम्याचा दावा सरकारने रद्द केला आहे.
चौधरी यांनी कोविडकाळात सेवा दिली होती की नाही, याची शहानिशा स्थानिक आरोग्य विभागाने पुन्हा करून त्यांचा प्रस्ताव राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे फेरविचारासाठी पाठवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
खासदारांनी केली होती मागणी
सरकारी रुग्णालयातील डॉक्टर व नर्सप्रमाणे खाजगी डॉक्टरांनाही
५० लाखांचे विमाकवच द्यावे, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे आणि संसदेत केंद्र सरकारकडे केली आहे.