पोलिसांच्या गाडीवर खाजगी वाहनचालक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:11 AM2018-07-28T00:11:06+5:302018-07-28T00:11:26+5:30
पोलीस ठाणी वाढली; वाहनांतही वाढ मात्र चालकांची वानवा
मुरबाड : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग ६१ हा मुरबाड तालुक्यातून जातो. या मार्गावर माळशेज घाट तसेच महामार्गावरील वेड्यावाकड्या वळणामुळे होणारे अपघात तसेच अवैध वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी उमरोली येथे स्वतंत्र महामार्ग पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. या पोलीस ठाण्याला स्वतंत्र वाहनव्यवस्था शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ही वाहने खाजगी वाहनचालक हाकतात.
मुरबाड तालुक्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ब्रिटिशांच्या राजवटीत मुरबाड शहरात पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. त्यांनी बांधकाम केलेल्या इमारतीतून आजही पोलिसांचा कारभार सुरू आहे. मात्र, कालांतराने वाढलेली तालुक्याची लोकसंख्या, तालुक्यातून गेलेला कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गावर होणारे अपघात, शिवाय या मार्गाचा गुन्हेगारीसाठी होणारा दुरु पयोग रोखण्यासाठी १० वर्षांपूर्वी टोकावडे येथे स्वतंत्र पोलीस ठाणे करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत गेल्याने उमरोली येथे महामार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले. टोकावडे तसेच उमरोली पोलीस ठाण्यांना शासनाने स्वतंत्र वाहने उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, वाहनचालक न दिल्याने येथील पोलीस अधिकाऱ्यांना खाजगी चालक ठेवावे लागतात. मात्र, यामुळे गोपनीयतेच्या नियमांचा भंग होऊ शकतात.
काही वेळा महत्त्वाच्या गुन्ह्यांतील आरोपी पकडायचे असतील, तर यासाठी वर्दीतील चालकच असणे आवश्यक असते. या चालकांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. मात्र, खाजगी चालकांवर कोणतेही बंधन किंवा जबाबदारी नसल्याने पोलिसांकडून होणारी कारवाई उघड होण्याची शक्यता असते. हे टळावे, यासाठी शासनाने टोकावडे पोलीस आणि उमरोली महामार्ग पोलिसांना शासकीय चालक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काही पोलिसांनीच नाव न छापण्याच्या अटीवर केली आहे.
राष्टÑीय महामार्ग उमरोली येथील पोलीस व्हॅनवर या आगोदर खाजगी चालक होता. मात्र, आता शासकीय चालक मिळाला आहे.
- भास्कर बेलदार, पो.ह. राष्टÑीय महामार्ग विभाग,
उमरोली पोलीस चौकी
टोकावडे पोलीस ठाण्याच्या गाडीवर दोन चालक आहेत. परंतु, गरज असेल तेव्हा खाजगी चालक घेण्यात येतो.
- डी.सी. पोरे, सहा. पोलीस निरीक्षक, टोकावडे पोलीस ठाणे