बदलापुरात स्वखर्चातून साकारली खासगी वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:37 AM2019-09-18T00:37:37+5:302019-09-18T00:37:40+5:30
निसर्गाने नटलेल्या कोंडेश्वर आणि भोज धरणाच्या डोंगरावरील वनसंपदा नष्ट झाली होती.
पंकज पाटील
अंबरनाथ : निसर्गाने नटलेल्या कोंडेश्वर आणि भोज धरणाच्या डोंगरावरील वनसंपदा नष्ट झाली होती. एकेकाळी दाट वनराई असलेल्या या परिसराला पुन्हा हिरवेगार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ही मोहीम शासकीय यंत्रणेने नव्हे तर, बदलापुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने राबवली आहे. भोज धरणाच्या काठावर असलेल्या ५ एकर जागेपैकी तीन एकरावर पाच वर्षांपूर्वी वृक्षारोपण करुन ती झाडे जगवण्याचे काम या कार्यकर्त्याने केले आहे. त्यामुळे हा परिसराला पुन्हा घनदाट वनराईने नटला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, परिसरातील ग्रामस्थदेखील वनराई जोपासण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
बदलापुरातील सामाजिक कार्यकर्ते आशीष गोळे यांनी बदलापूर शहरात गोळे फाऊंडेशनच्या नावाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांनी आता बदलापूर आणि परिसरात वनसंपदा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपन करून ते वृक्ष तसेच सोडून दिले जातात. त्या वृक्षांपैकी किती वृक्ष जगली, याची कधीच माहितीदेखील घेतली जात नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेसाठी वृक्षारोपण हे केवळ आकडेवारी वाढवण्याच्या कामाचे झाले आहे. विकास कामांसाठी वृक्षांची कत्तल होत असताना संबंधितांना नवीन वृक्ष लागवड करण्याची सक्ती केली जाते. मात्र त्यातील किती वृक्ष जगली, याची आकडेवारी कधीच पुढे येत नाही. त्यामुळे बदलापूर आणि परिसरातील वृक्षसंपदेला धोका निर्माण झाला आहे.
एकीकडे शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असताना गोळे यांनी पुढाकार घेत स्वबळावर वनसंपदा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:ची जागा वापरली आहे.
व्यावसायिक दृष्टीकोण बाजूला सारुन त्यांनी पाच वर्षांपूर्वी भोज धरणाच्या काठावर असलेल्या आपल्या ५ एकर जागेपैकी तीन एकरावर वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेतली. कोणाचीही मदत न घेता त्यांनी स्वखर्चाने वृक्ष लागवड केली. वृक्ष संवर्धन करण्यासाठी कायमस्वरुपी दोन कामगारदेखील ठेवले. त्या कामगारांच्या माध्यमातून ३ एकरमधील वनसंपदा जोपासण्याचे काम करण्यात आले. त्यांच्या या प्रयत्नांना पाच वर्षांनंतर यश आले आहे. ओसाड झालेले डोंगरमाळ आता हिरवाईने फुलले आहे. भोज धरणाच्या किनाऱ्यावर लांबच लांब पट्टा हा दाट जंगल स्वरुपात तयार झाला आहे.
गोळे यांनी पाच वर्षांपूर्वी जो उपक्रम हाती घेतला होता, त्या उपक्रमाला आज गती मिळाली आहे. ३ एकर जंगलासोबत त्यात वाढ करण्याची मोहीम ते हाती घेणार आहेत. कोंडेश्वर आणि परिसरात जगेचे भाव वाढलेले असतानाही त्यांनी जागेचा व्यावसायिक वापर न करता त्या जागेवर जंगलनिर्मितीचे काम हाती घेतले आहे.
गोळे यांच्या या प्रयत्नांमुळे आता परिसरात ग्रामस्थदेखील वनसंपदा सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी दाट वृक्ष असलेल्या या परिसरात नव्याने वृक्ष लागवडीची गरज आहे. गोळेंसारख्या सर्वच व्यक्ती खाजगी जंगल उभारण्यासाठी पुढाकार घेणार नाहीत, हे वास्तव आहे. मात्र शासनाने गोळे यांच्या उपक्रमातून काही बोध घेतला तरी, हा परिसर पुन्हा वनराईच्या स्वरुपात पुढे येईल.
>भोज धरणाजवळ केलेले काम मला बदलापूर शहरात करण्याची इच्छा होती. शहरात अनेक ठिकाणी एकर, दोन एकर जागेत जंगल निर्माण करुन त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. शहरात करणे शक्य न झाल्याने ग्रामिण भागात केले आहे. आता त्याचे अनुकरण झाले तरी आपल्याला समाधान मिळेल. - आशीष गोळे