खाजगी रुग्णांलयाचे दर होणार कमी, कोरोना बाधीत रुग्णांना मिळणार दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:25 PM2020-04-30T18:25:21+5:302020-04-30T18:25:45+5:30
खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया कोरोना बाधीत रुग्णांना आता ठाणे महापालिका दिलासा देणार आहे. खाजगी रुग्णांलयाकडून सुरु असलेली लुट आता थांबणार असून महापालिकेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांसाठी दरपत्रक जाहीर करणार आहे.
ठाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव हा ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दुसरीकडे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना खाजगी हॉस्पीटलकडून लुटु सुरु असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. यावर महापौर विरोधी पक्षनेत्या यांनीही आवाज उठविला होता. त्यानंतर या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन महापालिकेकडून खाजगी रुग्णालकडून सुरु असलेली लुट बंद करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या संदर्भात पालिकेकडून दरपत्रक जाहीर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शासकीय रुग्णालयाबरोबर आता खाजगी रुग्णालयांचाही ताण वाढू लागला आहे. परंतु खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट सुरु असल्याची माहिती वारंवार समोर आली आहे. काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यां रुग्णांकडूनही अशाच प्रकारची लुट सुरु असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे ही लुट थांबविण्यात यावी, खाजगी रुग्णांलयांना समज देण्यात यावी, दरपत्रक निश्चित करण्यात यावेत अशी मागणी मागील काही दिवसांपासून लावून धरली जात होती. महापौर नरेश म्हस्के तसेच विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनाही याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तर या संदर्भात बुधवारी आमदार संजय केळकर, भाजप शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन या बाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आता गुरुवारी या संदर्भात आयुक्त विजय सिंघल यांनी पालिकेच्या संबधींत विभागाबरोबर चर्चा करुन या बाबतचे धोरण निश्चित केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता खाजगी रुग्णालयांनी किती दर आकारावेत या बाबतची नियमावली तयार केली जाणार आहे. तसेच रुग्णांवर अधिकचा ताण पडू नये म्हणून यातील काही भार हा महापालिकाही उचलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार आता येत्या एक ते दोन दिवसात याबाबतचे दरपत्रक निश्चित करुन त्याची अंमलबजावणी रुग्णालय प्रशासनाने करावी असे आदेश दिले जाणार आहेत.