कर्जबाजारी झाल्यामुळे खासगी मोटारकार चालकाची ठाण्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:42 PM2021-06-20T23:42:46+5:302021-06-20T23:44:55+5:30
शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि अंगावरील कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या सुनिल सक्सेना (५०, रा. व्होल्टास कॉलनी, ठाणे) या खासगी मोटारकार चालकाने आपल्याच मोटारीमध्ये हातावर आणि गळयावर ब्लेडचे वार करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा आणि अंगावरील कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या सुनिल सक्सेना (५०, रा. व्होल्टास कॉलनी, ठाणे) या खासगी मोटारकार चालकाने आपल्याच मोटारीमध्ये हातावर आणि गळयावर ब्लेडचे वार करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुरुवातीला हा घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांसह सर्वांनाच वाटले. मात्र, त्यानेच मागे ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा उलगडा झाल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले.
सुनिल या चालकाचा प्रवासी मोटारकारमध्ये घोडबंदर रोडवरील सत्यम फोर्डच्या शोरुमसमोर रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना टीकुजिनीवाडी जवळील रस्त्यावर घडली. एका बंद कारमध्ये गळयावर आणि हातावर वार केल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे रात्रीच कोणीतरी त्याचा खून केल्याची शक्यता वर्तविली जात होती. वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ आणि चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी ही कार ताब्यात घेऊन हा मृतदेह बाहेर काढला. गाडीत मोठया प्रमाणात रक्तही होते. सुरुवातीला हा घातपाताचा प्रकार असल्याचा अंदाज होता. मात्र, व्होल्टास कॉलनी परिसरात राहणाऱ्या सुनिल याला शेअर मार्केटमध्ये मोठया प्रमाणात अपयश आले. त्याला क्रेडिट कार्ड तसेच इतरही काही कर्ज होते. याच विवंचनेतू नैराश्य आल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
* गाडीत पर्स विसरल्याचा केला बहाणा...
सुनिल याची पत्नी ठाण्यातील एका शाळेत शिक्षिका असून त्याला २३ आणि १५ वर्षांच्या दोन मुली आहेत. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री ८.३० वाजता तो घरी आला. मात्र, आपल्या कारमध्येच पैशांची पर्स विसरल्याचा बहाणा त्याने कुटूंबीयांकडे केला. मात्र, त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला. रविवारी सकाळीच ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह त्याच्या कारमध्ये मिळाल्याचे पोलिसांनी त्याच्या कुटूंबीयांना सांगितले. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याच्या पर्समध्येच चिठ्ठी तर कारमध्येच ब्लेडही मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.