तलाठ्यांचे खासगी ‘पीए’ सांभाळतात कामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:53 AM2018-09-28T02:53:13+5:302018-09-28T02:53:23+5:30
तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात.
- जनार्दन भेरे
भातसानगर - तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात. तलाठ्यांना केवळ सही करावी लागते. तालुक्यात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त असून त्यांचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे मंडळ अधिकारीही तलाठी सजाच्या कामासाठी या खासगी कर्मचाऱ्यांवरच विसंबून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहापूर तालुका हा जसा धरणांचा तालुका तसाच तो वेगवेगळ्या पिकांचाही तालुका. त्यामुळेच या तालुक्यात तलाठ्यांचे महत्त्व थोडे जास्तच आहे. प्रत्यक्षात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तलाठी नसल्याने सात तलाठी सजांचा कारभार मंडळ अधिकाºयांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्य:स्थितीत शेतकºयांच्या दृष्टीने तलाठ्यांची नितांत गरज आहे. तालुक्याच्या क्षेत्रफळाचा विचार करता नवीन सजा पुनर्रचना २०१८ नुसार तालुक्यात ५९ तलाठ्यांची गरज असून या रिक्त पदांसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद झाल्यानंतर पदनिर्मिती होऊन नियमानुसार पदे भरली जातील, अशी माहिती तहसीलदार रवींद बाविस्कर यांनी दिली.
महसुली गावे आणि क्षेत्रफळाचा विचार करता तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कामाचा ताण येणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यामुळे काही समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तलाठ्यांच्या पदनिर्मितीसाठी क्षेत्रफळ, गावांची संख्या, महसुली गावे, सातबारा यांची संख्या आदी बाबी विचारात घेतल्या जातात. मात्र, सद्य:स्थितीत तालुक्यासाठी मंजूर असलेल्या ३८ पदांपैकी केवळ ३१ तलाठी काम सांभाळत आहेत. सात तलाठ्यांचा प्रभार मंडळ अधिकारी सांभाळत आहेत. प्राप्त माहितीनुसार, मंडळ अधिकारी उपलब्ध नसल्यास तलाठी क्षेत्राचा कारभार तलाठ्यांनी नेमलेले खासगी कर्मचारी सांभाळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तलाठी नसल्याने या खासगी कर्मचाºयांची मनमानी सुरू असून त्यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे.
तालुक्यात मुगाव, साकुर्ली, अघई, दहीगाव, डोळखांब, बिरवाडी, साकडबाव या तलाठी सजांना तलाठी नाहीत. त्यामुळे शेतकºयांना सातबारा, फेरफार आठ अ, वारस तक्ते, शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाची कागदपत्रे मिळवताना अडचणी येत आहेत.
तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकºयांना थेट तहसील कार्यालय गाठावे लागत असून त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाने शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी, त्यांचा वेळ व पैशांची बचत व्हावी, यासाठी त्यात्या क्षेत्रानुसार तलाठी सजा निर्माण करून सोयी केल्या आहेत.
मात्र, सद्य:स्थितीत तालुक्यातील सात तलाठी सजांचे कामकाज नियमितपणे पाहण्यासाठी तलाठीच नसल्याने मंडळ अधिकाºयांना आधीची कामे सांभाळून तलाठ्यांचेही कामकाज पाहावे लागत आहे.
त्यामुळे पुरेसा वेळ देता येत नसल्याचे या मंडळ अधिकाºयांचे म्हणणे आहे. शेतकºयांच्या सोयीसाठी तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जोर धरत आहे. ही पदे भरली जात नसल्याने शेतकºयांना कामासाठी खेटे मारावे लागतात. यात त्यांचा पैसा आणि वेळ खर्च होत असल्याने प्रशासनाने ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. संबंधित यंत्रणा याकडे तातडीने लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.