सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही खासगी शाळांची फी वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:22+5:302021-07-07T04:50:22+5:30

ठाणे : एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या फी मध्ये १५ टक्के सवलत देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असतानाही या ...

Private school fees continue to rise despite Supreme Court ruling | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही खासगी शाळांची फी वाढ कायम

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही खासगी शाळांची फी वाढ कायम

Next

ठाणे : एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या फी मध्ये १५ टक्के सवलत देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असतानाही या आदेशाला न जुमानता खासगी शाळांनी फी वाढीचे धोरण कायम ठेवले आहे. त्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाबाबत पालक चिंतेत आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या तरी जोपर्यंत १५ टक्के फी सवलतीच्या बाबतीत सरकारच्या मार्गदर्शक सूचना येत नाहीत, तोपर्यंत शाळांवर कारवाई करता येत नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनापूर्वी मराठी शाळा टिकविण्याचे मोठे आव्हान असतानाच आता खासगी शाळांचे अस्तित्व ही धोक्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून शाळांना कुलूप असून या काळात अनेकांचे रोजगार बुडाले, कपात केलेले वेतन, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह प्रश्न अशी अनेक संकटे असतानाही यंदाच्या वर्षीही ठाण्यातील अनेक शाळांनी फी वाढ केली आहे. संचारबंदीच्या काळात शाळा बंद असून सध्या ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. अनेक सुविधांचा वापर केला जात नसल्यामुळे फी कमी करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत होती. दोन महिन्यांपूर्वी फी वाढ करू नये, असा निर्णय घेतल्यानंतर काही खासगी शाळांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यानंतर न्यायालयाने पालकांची बाजू समजून घेत फी मध्ये १५ टक्के सवलत देण्याचे आदेश दिले. मात्र अद्यापही ठाण्यातील शाळा या आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे.

………

कोट

माझी मुलगी एनिवर्सरी शाळेमध्ये शिकत असून सदर शाळेने कुठल्याही प्रकारची फी कपात केली नसून पालकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून होत आहे

पालक - ठाणे

………..

अन्यथा आंदोलन…

शाळा फी वाढ करत असल्यामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्यांना शिक्षण देणे कठीण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के फीमध्ये सवलत द्यावी असा आदेश दिला असून त्याची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यातील खासगी शाळांनी करावी अन्यथा मनसे आणि खासगी शाळांमधील पालक एकत्र येत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी दिला. यापूर्वीही फी वाढी संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रार करूनही याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही.

………………

Web Title: Private school fees continue to rise despite Supreme Court ruling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.