सर्वसामान्यांच्या मैदानावर खाजगी शाळेचा 'खेळ', न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलला आरक्षित भूखंड आंदण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 04:51 PM2021-01-28T16:51:31+5:302021-01-28T16:54:10+5:30

Thane News : सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाचा भूखंड वसंत लॉन्स गृहसंकुलाजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने खाजगी वापर केला आहे.

Private school 'game' on public ground, New Horizon Scholars School | सर्वसामान्यांच्या मैदानावर खाजगी शाळेचा 'खेळ', न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलला आरक्षित भूखंड आंदण

सर्वसामान्यांच्या मैदानावर खाजगी शाळेचा 'खेळ', न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलला आरक्षित भूखंड आंदण

Next

ठाणे -  सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाचा भूखंड वसंत लॉन्स गृहसंकुलाजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने खाजगी वापर केला आहे. या परिसरात मैदान नसल्याने लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागते. तसेच नागरिकांना जॉगिंगसाठी उपवन तलावाचा रस्ता धरावा लागतो. एकीकडे बच्चे कंपनीच्या ऑनलाईन खेळावरून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच परिसरातील मैदानावर खासगी शाळांचा 'खेळ' सुरु असेल, तर मनसेकडून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ठाणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखडयानुसार वसंत लॉन्सजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलशेजारी ६६००  चौमी (१.६१ एकर) क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान नियोजित आहे. या मैदानाला शाळेने संरक्षित भिंत उभारून ते बंदिस्त केले आहे. दुसरीकडे गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा गाव, साईनाथ नगर, चिरागनगर, हरदासनगर या मध्यमवर्गीय लोकवस्तीमधील मुलांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान खुले नसल्याने रस्त्यावरच खेळाचा 'डाव' मांडावा लागतो. पालकांना मुलांनी पबजीसारखे ऑनलाईन गेम खेळू नये व मैदानी खेळ खेळावेत असे वाटते. परंतु मैदानच जर खुले नसेल तर मुलांनी करायचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. या जागेवर न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने अतिक्रमण केलेले आहे. पालिकेच्या शहर विकास विभागामार्फत याबाबत स्पष्ट निर्देश असताना देखील शाळेने मैदानाचा वापर स्वत: करिता केलेला आहे. तसेच मैदान ठाणे पालिकेस हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात मैदान सर्वसामान्यांसाठी खुले न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा दणका दिला जाईल, अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे. याबाबत पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त, महापौर, शिक्षण समिती सभापती आणि न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यव्हार केला असून मैदान स्थानिकांच्या हक्काचे आहे ते तात्काळ खुले करावे, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे. 

 उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली 
खेळाच्या मैदानाबाबत उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी सार्वजनिक मालमत्ता असल्याने खाजगी वापर करता येणार असा निर्वाळा दिलेला आहे. मात्र या प्रकरणात त्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली असून शाळेच्या अशा मनमानी कारभारावर पालिकेने कारवाई करावी, असे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

Web Title: Private school 'game' on public ground, New Horizon Scholars School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.