खासगी शाळांनी शालेय शुल्कात १५ टक्के कपात करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:31+5:302021-08-22T04:42:31+5:30

कल्याण : शाळांनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शालेय शुल्कात १५ टक्के कपात करावी, असे निर्देश शासनाने दिले असतानाही त्याची ...

Private schools should reduce school fees by 15 per cent | खासगी शाळांनी शालेय शुल्कात १५ टक्के कपात करावी

खासगी शाळांनी शालेय शुल्कात १५ टक्के कपात करावी

Next

कल्याण : शाळांनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शालेय शुल्कात १५ टक्के कपात करावी, असे निर्देश शासनाने दिले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यास कल्याण-डोंबिवलीतील अनेक शाळा व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहेत. अशा शाळांकडून या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे केडीएमसीच्या शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच शहरातील प्रमुख शाळांनाही याबाबत निवेदन दिल्याचे आपचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी सांगितले.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे गोरगरिबांचे नोकरी-व्यवसाय हिरावले गेले. कल्याण-डोंबिवलीतील लाखो कुटुंबांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोविडचे रुग्ण कमी होत असले तरी व्यवहार सुरळीत होण्यास बराच कालावधी जाणार आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांकडून ऑनलाईनद्वारे शिक्षण दिले जात आहे. मात्र, शाळा-महाविद्यालये सुरू होण्याची स्थिती पाहता शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शालेय शुल्क आकारणीस प्रारंभ केला आहे. मात्र, गरीब-मध्यमवर्गीय पाल्यांची फी कशी भरायची या विवंचनेत आहेत. शाळा पूर्ण फी आकारत असल्याच्या तक्रारी आल्याने देसाई यांनी केडीएमसीच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी तडवी यांना निवेदन दिले.

शहरातील विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांनी शालेय शुल्कात १५ टक्के कपात करण्याच्या शासनाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे किंवा कसे, याकडे लक्ष द्यावे व पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत कल्याण-डोंबिवली निवडणूक प्रचार समितीचे सिद्धार्थ गायकवाड, नीलेश पांडे, प्रभाग ३५ चे अध्यक्ष फाईज मुल्ला, उमेश परब, आदी उपस्थित होते.

शिक्षण संस्थांनाही निवेदन

कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख १० ते १२ शाळांनाही याबाबत निवेदन देण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले. ज्या शाळा निवेदन स्वीकारणार नाहीत त्यांना पोस्टाने पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------

Web Title: Private schools should reduce school fees by 15 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.