‘त्या’ खाजगी सुरक्षा रक्षकांना परिवहन विभागाने दिला नारळ; तिकिट तपासणीसाची सेवा बजावित होते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 06:29 PM2018-03-29T18:29:23+5:302018-03-29T18:29:23+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या सुरक्षा रक्षकांनी सेवेतून कमी केल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या सुरक्षा रक्षकांनी सेवेतून कमी केल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.
पालिकेने मुख्यालयात नियुक्त केलेल्या सुमारे २० ते २५ खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ सुरक्षा रक्षकांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसाचा अतिरीक्त कार्यभार सोपविला होता. त्यामुळे मुख्यालयातील सुरक्षा रक्षकाचे अर्धवेळ काम आटोपून दुपारी ३ वाजताच्या सुमारास परिवहन सेवेत तिकिट तपासणीसाचे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. यात त्यांना तिकिट तपासणीसाचे कोणतेही ज्ञान तसेच त्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही ते काम दिल्याने नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्यांना त्याचे प्रशिक्षण दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले तर दिलेले प्रशिक्षण अपुरे असल्याचे त्या कर्मचा-यांकडुन सांगण्यात आले. यामागे प्रशासनाकडून नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी परिवहन सेवा चालविण्यासाठी पालिकेला सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करणा-या सैनिक सिक्युरीटी या कंपनीला कंत्राट देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु झाला होता. त्याची निविदाही कंपनीने भरली होती. मात्र एकच निविदा प्राप्त झाल्याने पालिकेने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कंत्राट त्याच कंपनीला देण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्नातूनच त्या सुरक्षा रक्षकांना सुरुवातीला तिकिट तपासणीसाच्या कामाला जुंपण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली होती. कालांतराने त्यांची पुर्ण वेळेकरीता परिवहन विभागात कंत्राटावरच नियुक्ती करण्यात आली. पालिकेकडून परिवहन सेवेसाठी एकुण १००व पैकी ५२ बसच खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यातील १० नवीन बस प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोंदणी अभावी धूळ खात उभ्या आहेत. तर उर्वरीत ४२ पैकी ३५ ते ३६ बस प्रवासी सेवेसाठी दररोज उपलब्ध होतात. यामुळे परिवहन सेवा अपुरी ठरत असल्याची ओरड स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे. त्यातच हि सेवा चालविण्यासाठी सुमारे ३५० कर्मचारी विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असताना पुढे बसची संख्या वाढणार असल्याने त्या १२ सुरक्षा रक्षकांची सेवा आवश्यक ठरणार असल्याचे गृहित धरुन गेल्या आठवड्यात पुन्हा त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र अचानक परिवहन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या १२ सुरक्षा रक्षकांना विभागात अतिरीक्त कर्मचारी ठरल्याच्या कारणावरुन कमी करण्यात येत असल्याचे कळविले. त्यामुळे परिवहन सेवेतून नारळ मिळाल्यानंतर त्या कर्मचाय््राांनी पुन्हा सुरक्षा रक्षकाच्या सेवेतील नियुक्तीसाठी प्रयत्न सुरु केला. मात्र त्यांना तेथेही लाल दिवा दाखविण्यात आल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत परिवहन विभागाचे आगार व्यवस्थापक सुरेश कलंत्रे यांना संपर्क साधला असता त्यांनी त्याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.