लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील शिक्षिकेवर ठाण्यात लैंगिक अत्याचार : आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:07 PM2018-03-06T23:07:49+5:302018-03-06T23:07:49+5:30
डोंबिवलीतील शिक्षिकेवर लग्नाचे अमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणा-या सुरज सूर्यवंशीला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. चाकूचा धाक दाखवून मारहाण करून डोक्यात दगड टाकण्याचीही त्याने तिला धमकी दिली होती.
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील एका खासगी क्लासेसच्या २५ वर्षीय शिक्षिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणा-या सुरज दिनकर सूर्यवंशी (२६, रा. रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळामार्फत पीडित शिक्षिकेची सुरज याच्याशी मे २०१७ मध्ये ओळख झाली. याच संकेतस्थळावरून त्याने मोबाइल क्रमांक घेऊन तिला फोन आणि मेसेज करण्यास सुरुवात केली. यातूनच दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्याने तिच्या आईवडिलांशीही बोलणे करून आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. आॅगस्ट २०१७ मध्ये त्याने तिला ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवर फिरवले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून ओवळानाका येथील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यानंतरही १८ नोव्हेंबर २०१७ आणि ५ जानेवारी २०१८ रोजी त्याने अशाच प्रकारे लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पुढे लग्नाचा विषय काढल्यावर मात्र तो तिला टाळाटाळ करू लागला. तिच्या आईवडिलांनी त्याला याचा जाब विचारल्यानंतर त्याने अखेर डिसेंबर २०१७ मध्ये लग्न करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात ५ मार्च २०१८ पर्यंत त्याने वेगवेगळ्या कारणांनी तिची फसवणूक केली. दरम्यानच्या काळात जानेवारी २०१८ मध्ये शिवीगाळ करून दोघे आंतरजातीय असल्यामुळे त्याने तिला लग्नाला नकार दिला. तर, १२ फेब्रुवारी २०१८ रोजी मुलुंड चेकनाका येथे त्याने चाकूचा धाक दाखवून मारहाण करून डोक्यात दगड टाकण्याचीही धमकी दिली, अशी तक्रार तिने नौपाडा पोलीस ठाण्यात ६ मार्च रोजी रात्री दाखल केली. तिच्यावर अत्याचाराचा संपूर्ण प्रकार हा कासारवडवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील परिसरात घडलेला असल्यामुळे हे प्रकरण आता कासारवडवली पोलिसांकडे वर्ग केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. सुरज सूर्यवंशी याला अटक केल्याची माहिती कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी दिली. महिला उपनिरीक्षक आर.बी. रत्ने याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.