उल्हासनगरात साफसफाईच्या खाजगीकरणांचा घाट?, कामगारात संतापाची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 06:37 PM2021-08-29T18:37:21+5:302021-08-29T18:37:28+5:30
आयुक्त, महापौर, उपमहापौरांच्या उपस्थितीत बैठक
सदानंद नाईक
उल्हासनगर : प्रभाग समिती क्रं-३ मधील सफाईचे खाजगीकरण प्रायोगिकतत्वावर करण्याची चर्चा स्थायी समिती सभागृहात आयुक्तांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी दिली. खाजगी ठेकेदार २५० सफाई कामगारा मार्फत सफाई करणार असून यासाठी वर्षाला ७ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सफाईचे खाजगीकरणांचा घाट असल्याचा आरोप ओमी कलानी टीमचे नगरसेवक मनोज लासी यांनी केला.
उल्हासनगरातील साफसफाई महापालिकेच्या १८०० पेक्षा जास्त सफाई कामगारा मार्फत केली जाते. सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने, सफाईचा बोजवारा उडल्याची ओरड होत असून यावर उपाय म्हणून प्रभाग समिती क्रं-३ मधील सफाईचे खाजगीकरण करण्याचा घाट सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून घातला जात असल्याचा आरोप ओमी कलानी टीमचे समर्थक नगरसेवक मनोज लासी यांनी केला. खाजगी ठेकेदारांच्या सफाई कामगारा मार्फत सफाई करण्याच्या बैठकीला आयुक्त डॉ राजा दयानिधी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, आरोग्य विभागाचे उपायुक्त मदन सोंडे, आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी आदी जण उपस्थित होते.
महापालिका प्रभाग समिती क्रं-३ मधील सफाईसाठी खाजगी ठेकेदार २५० कंत्राटी कामगाराकडून सफाई करून घेणार आहे. तर समिती क्रं-३ मधील महापालिकेच्या सफाई कामगारांना अन्य प्रभाग समिती मध्ये समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती सभापती टोनी सिरवानी यांनी दिली. समिती क्रं-३ मधील सफसफाईवर वर्षाला ७ कोटी तर ३ वर्षाला २१ कोटीचा खर्च येणार असल्याची चर्चा बैठकीत झाली. असे सिरवानी यांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांना याबाबत विचारले असता, याबाबत प्राथमिक तत्वावर चर्चा झाली. मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच सफाईचे खाजगीकरण करून भविष्यात महापालिकेच्या सफाई कामगारांवर प्रश्नचिन्हे उभे ठाकल्याने, सफाई कामगारात संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेचा कारभार उंटावरून शेळी हकालण्यासारखा
महापालिकेच्या विविध विभागात गोंधळ उडाला असून शहरहिता ऐवजी ठेकेदारांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे. याप्रकारने महापालिका आर्थिक अडचणीत सापडल्याची टीकाही सर्वस्तरातून होत आहे. सफाईच्या खाजगीकरण निर्णयाला विरोध करणार असल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनी दिली.